वर्धा : शासनाने राज्यात नव्या १३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा केली. मात्र एक महाविद्यालय मात्र चांगलेच गाजत आहे. होणार की नाही व नंतर कोणत्या जागेवर या पैलूने हिंगणघाटचे महाविद्यालय गाजत आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेत बुधवारी सायंकाळी या महाविद्यालयात विशेष सभा झाली. बैठक घडवून आणणारे आमदार समीर कुणावार हे म्हणाले की सर्व कामे वेळीच मार्गी लागणार. तसेच हिंगणघाट शासकीय महाविद्यालय हे ग्रीन फिल्ड झोनमध्ये टाकण्यात आले आहे. म्हणून चिंता नाही.

पण ग्रीन फिल्ड हा काय प्रकार हे आमदार कुणावार सविस्तर सांगू शकले नाही. याबाबत वैद्यकीय वर्तुळतून माहिती घेतल्यावर ग्रीन फिल्ड मध्ये हे महाविद्यालय असेल तर आनंदाचीच बाब म्हणावी लागेल, अशी प्रतिक्रिया मिळाली. ग्रीन व ब्राउन फिल्ड असे दोन प्रकार नवे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करतांना विचारात घेतल्या जातात. एखादे वैद्यकीय महाविद्यालय मान्य करतांना प्रथम किमान ३०० खाटांचे रुग्णालय अपेक्षित असते. ते असेल तरच तात्काळ महाविद्यालय अंमलात येते. अन्यथा राष्ट्रीय वैद्यकीय आयोग त्यास मान्यता देत नाही. हिंगणघाट येथे पुरेश्या सोयी असलेले ५० बेडचे पण रुग्णालय नाही. त्यामुळे महाविद्यालय मान्यच केल्या जाणार नाही. पण लोक रेट्यापोटी जर वैद्यकीय महाविद्यालय घोषित झाले असेल व रुग्णालय नसेल तर मग असे महाविद्यालय ग्रीन फिल्ड मध्ये टाकल्या जाते.

हिंगणघाटचे तसेच झाले असावे. येथील शासकीय महाविद्यालय मंजूर तर झाले पण रुग्णालयाची सोयच नाही. अश्या स्थितीत मंजूर महाविद्यालय वैद्यकीय आयोगाने अमान्य केले असते. ते होवू नये म्हणून राजकीय बळ त्यामागे असने आवश्यक ठरते तरच संपूर्ण नव्याने उभे करण्यासाठी ग्रीन फिल्ड दर्जा दिल्या जातो, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने नमूद केले. गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ब्राऊन फिल्ड मध्ये आहे. कारण तिथे अपेक्षित रुग्णालय आहेच.

आता हिंगणघाट ग्रीन फिल्ड मध्ये आल्याने रुग्णालय व महाविद्यालय सोबतच बांधणे अनिवार्य ठरेल. हे चांगलेच. कारण वैद्यकीय शिक्षण व उपचार असे दोन्ही पैलू विचारात राहतील. जसे नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. आता हिंगणघाट येथे प्रस्तावित हे महाविद्यालय पुढील ५० वर्षाचा विचार करून बांधल्या जाणार. सर्व सोयीचा विचार होईल. रुग्णालय व महाविद्यालयाची वास्तू सोबतच बांधली जाईल. अपेक्षित निधी मोठा लागणार. ती बाब राजकीय कुशलतेची ठरू शकते. पण जेव्हा होईल तेव्हा ते अत्याधुनिक होईल. आता जर कॅन्सर केंद्र पण मान्य झाले असेल तर मग हे महाविद्यालय संपूर्ण परिसरासाठी वरदान ठरणार, अशी माहिती एक तज्ञ डॉक्टरने दिली.

Story img Loader