नागपूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नागपुरात भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘कलंक’ हा शब्द वापरला आणि एका रात्री तो सर्व प्रमुख राजकीय पक्ष नेत्यांच्या तोंडचा परवलीचा शब्द झाला. दोन दिवसांत कोण कोणासाठी कसा कलंक आहे हे सांगण्याची जणू स्पर्धाच लागली. भाजपा आणि विरोधी पक्षातील ९ प्रमुख नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. या सर्व घडामोडींमध्ये भाजपा राबवत असलेल्य ‘मोदी @9’ ची चर्चा मागे पडली. त्याची जागा कलंक @9 ने घेतली आहे.
कलंक या शब्दाचा प्रयोग करत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस हे नागपूरला कलंक आहे, असा आरोप केला. दुसऱ्या क्षणापासून टीम भाजपा उद्धव यांच्यावर तुटून पडली. फडणवीस यांनी तर ठाकरेच कसे महाराष्ट्रासाठी कलंक आहेत हे सांगणारी जंत्रीच माध्यमांना दिली. दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना ‘कलंकित करंटा’ म्हटले. ऐवढेच नव्हे तर संपूर्ण पत्रकार परिषदेत एकूण तीस वेळा कलंक या शब्दाचा वापर करून तो सर्वाधिक लोकप्रिय केला.
हेही वाचा – प्रतिक्षा संपली ! बी. फार्म. पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ
भाजपा विधी आघाडीने कलंक शब्द प्रयोगामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून पोलिसांकडे तक्रार केली. भाजपाला पाठिंबा देणारे रवी राणा यांनीही उद्धव हे बाळासाहेबांच्या नावाला कलंक आहे, असे म्हणाले. मित्र पक्ष शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनीही यात ऊडी घेत पक्ष फुटीचा कलंक उद्धव कसा पुसणार असा सवाल केला. सर्वात संयमी प्रतिक्रिया आली ती भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची. राजकारणात व्यक्तिगत टीका टाळावी, असा सल्ला देत त्यांनी फडणवीस यांना कलंक म्हणण्याचा निषेध केला.
भाजपा, मित्र पक्षांना तोंड देण्यासाठी मग शिवसेना, कॉंग्रेस मैदानात उतरली. कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तर फडणवीस यांना नागपूरचा कलंक म्हणणे योग्यच आहे असे सांगितले व भाजपा नेते विरोधकांसाठी कोणते शब्द वापरतात याची जंत्री सादर केली. सेनेचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनीही कलंकच्या लढाईत शिवसेना मागे हटणार नाही असे बजावले. एकूण ‘कलंक @ 9’ (९ नेत्यांच्या प्रतिक्रिया) ची नागपुरात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यात ‘मोदी @9’ मागे पडले आहे.