लोकसत्ता टीम
नागपूर : महामेट्रोने नागपूरमध्ये डिजीटल तंत्रज्ञानावर अधिक भर दिला आहे. मेट्रोच्या वेळापत्रकापासून तर तिकीट खरेदीपर्यंत सर्वच सुविधा डिजीटल आहे. मेट्रोमहाकार्डमुळे प्रवाशांना तिकीट रांगेत उभे राहण्याची गरज नाही,अनेक सेवा ऑनलाईन आहेत. त्यात आमखी एकाची भर पडली आहे. त्याचे नाव आहे. ‘टॉयलेट सेवा ॲप’.
मेट्रोची नागपगुरातील सर्व स्थानके तेथील भव्यतेसाठी प्रसिद्ध आहे. प्रवाशांच्या सुरक्षेवर येथे अधिक भर दिला जातो. मेट्रो गाड्यांमध्येही सीसीटीव्हीची नजर असते. स्वच्छतेचीही खबरदारी घेतली जाते. महिला, पुरुष, दिव्यांगांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहांची व्यवस्था स्थानकांवर आहे. ती स्थानकाच्या कुठल्या भागात आहे, यासाठी दीशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. आता मेट्रोने यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून‘टॉयलेट सेवा ॲप’ आणला आहे. या ॲपद्वारे प्रसाधन गृहांचे स्थान जाणून घेता येणार आहे.
आणखी वाचा-लोकजागर: वर्चस्ववाद व खच्चीकरण!
अमेरिकेतील आयटी अभियंते अमोल भिंगे यांनी हे ॲप तयार केले असून ते निशुल्क आहे. यामुळे महिला व वृद्ध नागरिक,विद्यार्थी आणि इतर नागरिक यांना प्रसाधनगृह शोधण्यासाठी या ॲपची मदत होणार आहे. टॉयलेट सेवा ऍप ‘स्वच्छ प्रसाधनगृह’ अशी मोहीम राबविण्यात येत आहे. याद्वारे प्रसाधनगृहातील नीटनेटकेपणा,स्वच्छता, पाण्याची उपलब्धता, नळ व बेसिनबाबत काही तक्रारी असल्यास त्या या ॲपद्वारे संबंधित यंत्रणेकडे तक्रार/सूचना पोहोचवणे सहज शक्य होणार आहे. तसेच संबंधित संस्थेने तक्रार निवारण केल्यावर संबंधित तक्रारदाराला त्याचा अभिप्राय मिळणार आहे.
नागपूर मेट्रो आणि टॉयलेट सेवा यांच्या समन्वयामुळे नागपूर मेट्रोच्या प्रसाधनगृहांची अद्यावत माहिती नागरिकांना/प्रवाशांना जाणून घेत येईल. तसेच प्रसाधनगृहांच्या संबंधीची तक्रार-सूचना ॲद्वारे नोंदविता येणार आहे. टॉयलेट सेवा ऍप हे प्लेस्टोर आणि आयओएसच्या माध्यमाने डाउनलोड करू शकता किंवा प्रसाधनगृह येथे उपलब्ध क्यूआर कोड स्कॅन करून देखील डाउनलोड करता येईल. टॉयलेट सेवा ॲप हा एक स्तुत्य उपक्रम असून यामाध्यमातून स्थानक परिसरातील प्रसाधनगृहांमध्ये नागरिकांना आमूलाग्र बदल करणे शक्य होणार आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. शहराच्या चारही दिशेने मेट्रोव्दारे प्रवास करणे शक्य झाले आहे. विशेषत: शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मेट्रोचा प्रवास सुरक्षित आणि तुलनेने स्वस्त मानला जातो. मेट्रोच्या टप्पा दोनच्या कामालाही सुरूवात झाली असून या माध्यमातून नागपूरजवळील छोटी शहरे शहराशी जोडली जाणार आहे.