लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात आलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या गृहनिर्माण प्रकल्पातील सदनिका वाटपासाठी लवकरच ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढली जाणार आहे. प्रकल्पातील ४८० सदनिकांसाठी १८१९ नागरिकांचे ऑनलाईन अर्ज महापालिकेला प्राप्त झाले आहेत.

महापालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी यासंदर्भात आढावा बैठक घेऊन लॉटरी काढण्याबाबत निर्देश दिले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामठी रोडवरील पिवळी नदीजवळ मौजा वांजरा येथे महापालिकेच्या माध्यमातून ‘स्वप्ननिकेतन’ हा ४८० सदनिकांचा गृह प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामध्ये २८.२१ चौ.मी./३०३.६५ चौ. फूट चटई क्षेत्रफळाची ‘वन बीएचके’ सदनिका आहे. सदनिका खरेदी करण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून महापालिकेच्या पोर्टलवर अर्ज मागवण्यात आले होते. यामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला असून ४८० सदनिकांसाठी १८१९ अर्ज प्राप्त झाले आहेत. प्रकल्पातील ४८० सदनिकांमध्ये ५० टक्के अर्थात २४० सदनिका अराखीव असून १३ टक्के अनुसूचित जाती, ७ टक्के अनुसूचित जमाती, ३० टक्के इतर मागास प्रवर्ग आणि ५ टक्के समांतर आरक्षण दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव आहे.

आणखी वाचा-उलटचोच तुतारी पक्ष्याचे अवेळी स्थलांतर, जाणून घ्या कारण…

सुविधा काय?

या गृहनिर्माण प्रकल्पात उद्यान, कम्युनिटी हॉल, लॉबी, लिफ्ट आणि पाणीपुरवठा करणाऱ्या पंपला लागणाऱ्या वीजनिर्मितीसाठी सोलर पॅनलची सुविधा, सौर ऊर्जेमार्फत गरम पाण्याची सुविधा, पर्जन्य जलसिंचन प्रकल्पाची सुविधा, जलनि:स्सारण इ. सुविधांचा समावेश आहे.

किंमत किती?

सदनिकेची एकूण किंमत रु. ११,५१,८४५ (अंदाजित) एवढी असून शासनातर्फे २,५०,००० रुपये अनुदान देण्यात येत असल्याने लाभार्थ्यांना ९,०१,८४५ रुपये द्यावे लागणार आहेत. याव्यतिरिक्त वीज मीटर, जीएसटी, रजिस्ट्रीचा खर्च, स्टॅम्प ड्युटी, सोसायटी डिपॉझीट, ॲग्रिमेंन्ट सेलडीडसाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is nagpur municipal corporation housing project vmb 67 mrj
Show comments