अकोला : हिंदू धर्म शास्त्रानुसार चातुर्मास प्रारंभ झाल्यावर (म्हणजेच आषाढ शुद्ध एकादशीनंतर) येणारा पहिला मास हा श्रावण मास होय. रूढी परंपरेनुसार या मासापासून व्रत वैकल्ये सुरू होतात. या मासाला पवित्र मास म्हणतात, अशी माहिती सनातन संस्थेच्या विभा चौधरी यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. पवित्र मासात श्रावणी सोमवार, नागपंचमी, मंगळागौर पूजन, गोकुळाष्टमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, शुक्रवारचे व्रत अशी अनेक व्रते केली जातात. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी ‘श्रावणी सोमवार’ हे व्रत केले जाते.

२. या वर्षीच्या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे व्रत ५, १२, १९, २६ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर या दिवशी असणार आहे. या महिन्यातील प्रत्येक श्रावण सोमवारी हे व्रत करावे.

हेही वाचा : Shravan 2024 : यंदा किती श्रावण सोमवार असणार? कोणती शिवमूठ वाहावी? जाणून घ्या सविस्तर

३. श्रावण मासातील सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीला अभिषेक घालणे, पूजा करणे, शिवामूठ वाहणे अशा प्रकारे हे व्रत केले जाते. सोमवार व्यतिरिक्त अन्य व्रते धर्माने सांगितल्या प्रमाणे आणि रूढी परंपरेनुसार सुरू असतात. या पवित्र श्रावण महिन्यातील व्रते भक्ती भावाने केली जातात.

४. श्रावण महिन्यातील दर सोमवारी शंकराच्या देवळात जाऊन त्याची पूजा आणि निराहार उपवास किंवा नक्त व्रत करण्याची प्रथा आहे. श्रावण सोमवारी उपवास करून शिवाची विधिवत पूजा करण्याचे महत्व ग्रंथ व्रत राजमधील श्लोकातून दिले आहे.

‘उपोषितः शुचिर्भूत्वा सोमवारे जितेन्द्रियः।

वैदिकैर्लौकिकैर्मन्त्रैर्विधिवत्पूजयेच्छिवम् ।।’

५. संयम आणि शुचिर्भूतपणा आदी नियमांचे पालन करत सोमवारी उपवास करून वैदिक अथवा लौकिक मंत्राने शिवाची विधीवत् पूजा करावी, असा त्या श्लोकाचा अर्थ आहे.

हेही वाचा : सावधान! राज्यात हिवतापाच्या रुग्णांमध्ये ३३ टक्के वाढ, मृत्यू तिप्पट; बृहन्मुंबईसह येथे सर्वाधिक रुग्ण…

६. शास्त्रकारांनी मनावर संयम ठेवून, शुचिर्भूतपणादी नियम पाळण्याविषयी, तसेच उपवास करण्याविषयी सांगितले आहे. त्याचप्रमाणे आपापल्या ज्ञानाच्या आधारे शक्य असेल, त्या वैदिक अथवा लौकिक मंत्रांद्वारे शिवाची पूजा करायला सांगितली आहे.

७. शिवाची पूजा कशी करावी हे जाणून घेऊया : आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल, तर शिवाच्या चित्राची पूजा करावी. शिवाच्या चित्रसुद्धा उपलब्ध नसेल, तर पाटावर शिवलिंगाचे किंवा शिवाचे चित्र काढून त्याची पूजा करावी. ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नाममंत्र लिहूनही त्याची आपण पूजा करू शकतो.’

८. शिवाची षोडशोपचार पूजा किंवा पंचोपचार पूजा करू शकतो. पूजा करताना शिवाला पांढरे फुल वाहू शकतो. त्रिदल बेल वहावा. शिवाला अर्ध प्रदक्षिणा घालावी. त्या दिवशी शिवाचा ‘ॐ नम: शिवाय’ असा नामजप अधिकाधिक करावा.

हेही वाचा : “नदीसंवर्धन, विकासासाठी खनिज विकासनिधी उपयोगात आणा”, नरेश पुगलिया यांचा सल्ला

९. शिवामूठ व्रत करण्याची पद्धत : विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते.

१०. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या, असे सनातन संस्थेच्या विभा चौधरी यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is shravan month shravan somvar and shivamuth puja vidhi shravan 2024 ppd 88 css