नागपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यांच्या या नागपूर दौऱ्याबाबत अनेक वैशिष्टपूर्ण गोष्टी घडत आहेत.
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल तसेच नक्षलग्रस्त म्हणून प्रसिद्ध आहे. या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या गावात गोंडवाना विद्यापीठ आहे. या विद्यापीठाअंतर्गंत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालये आहेत. या विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सहभागी झाल्या आहेत. तसेच सायंकाळी नागपुरातील कोराडी येथे भारतीय विद्या भवनकडून निर्माण करण्यात आलेले रामायण सांस्कृतिक केंद्राचे लोकार्पण होणार आहे. या रामायण सांस्कृतिक केंद्रात चित्र स्वरूपात रामायणाची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. दक्षिण भारतीय शैलीत हे सेंटर तयार करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>बुलढाणा: नाल्याला आलेल्या पुरात बैलगाडीसह तिघे वाहून गेले; दोघे बचावले एक बेपत्ता
पहिल्या मजल्यावर महाकाव्य रामायणातील प्रसंग विविध चित्रांच्या स्वरूपात मांडलेले आहेत. महर्षी तुलसीदासांच्या रामायणाच्या लेखनापासून ते रामायणाच्या मूळ कथेपर्यंत एकूण १०८ चित्रे या दालनात मांडण्यात आली आहेत. राष्ट्रपती उद्या, गुरुवारला नागपुरातील राजभवन येथे आदिवासी समूहाच्या प्रतिनिधींशी चर्चा करतील.