नागपूर: कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा भाग म्हणून राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यावर्षीपासून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्यांची शाळा सोडून अन्य शाळांमध्ये केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक म्हणून काम करावे लागणार, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, शिक्षण मंडळाच्या या निर्णयाला काही शिक्षक संघटनांकडून विरोध होत आहे. हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखवण्याचा प्रकार असून यामुळे शिक्षकांची प्रतिमा मलिन होईल असा आरोप होत आहे. शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिकांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २४ जानेवारीपासून तर दहावीची ३ फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. या परीक्षेच्या तोंडावरच शिक्षण मंडळाने धाडसी निर्णय घेतला आहे. परंतु, शिक्षक वर्गातून याला विरोध होत आहे. शाळांचे शिक्षक हे त्याच शाळांमध्ये पर्यवेक्षक म्हणून राहिल्यास अनेकदा कॉपीमुक्त अभियान राबवण्यास अडचणी येतात असे शिक्षण मंडळाचे निरीक्षण आहे. त्यामुळे शिक्षण मंडळाकडून दरवर्षी नवनवीन उपययोजना केल्या जातात. या नवीन निर्णयानुसार एका शाळेतील विद्यार्थ्यांना जर त्याच शाळेत शालांत परीक्षेचे केंद्र मिळाले तर तेथील मुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्या शाळेत परीक्षेचे पर्यवेक्षण करता येणार नाही. या शिक्षकांना पर्यवेक्षणासाठी दुसऱ्या शाळेत पाठवले जाणार असल्याचे या निर्णयात म्हटले आहे. यामुळे, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची डोकेदुखी वाढणार आहे. या परीक्षेकरिता जे केंद्र असेल तेथे त्याच शाळेचे शिक्षक हे पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केले जातात. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या पद्धतीला छेद पडणार असल्याने या निर्णयाचा शिक्षकांमधून विरोध सुरू झाला आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पीक विमा योजनेत भ्रष्टाचार, तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या निर्णयाची चौकशी करा-वडेट्टीवार

शिक्षण मंडळाचे अधिकारीही संभ्रमात

या निर्णयाची अंमलबजावणी कशी करावी याबाबत मंडळाच्या अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम आहे. ग्रामीण भागात दोन शाळांमध्ये २० ते ३० किलोमीटरचे अंतर असते. शहरांतही एका शाळेतील शिक्षक दुसऱ्या शाळेत पाठवणे सोपे नाही. जवळपास प्रत्येकच शाळेत त्या शाळांमधील काही विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र मिळते. या निर्णयामुळे शेकडो शिक्षकांना त्यांच्या शाळेतून दुसऱ्या शाळेत पाठवावे लागेल. परीक्षेच्या तोंडावर शाळा बदलीची नियोजन करणे आव्हानात्मक असल्याचे मत मंडळाच्या अधिकाऱ्यांकडूनही व्यक्त होते आहे.

हेही वाचा >>>शक्तिपीठ महामार्गाला यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे समर्थन; भूसंपादन प्रक्रिया तत्काळ…

बारावी आणि दहावीच्या परीक्षा तोंडावर असताना हे नवीन बदल करण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात केवळ पंधरा दिवसांत एका ठिकाणचे कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी पाठविणे शक्य होणार नाही. प्रत्येक केंद्रातील विद्यार्थीसंख्या आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संख्येत फरक असतो. भौतिक सुविधेत तफावत असते. परीक्षेच्यादरम्यान करावा लागणारा प्रवास यामुळे शिक्षकांचे वेळेचे नियोजन कोलमडणार आहे. आजपर्यंत सर्वच परीक्षा शिक्षकांनी आपल्याच केंद्रात राहून यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. मात्र अचानक मंडळाने शिक्षकांवर गैरविश्वास दाखवून त्यांची केंद्रे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ही गंभीर बाब आहे. -सपन नेहरोत्रा, विभागीय कार्यवाह, शिक्षक भारती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the decision of the state board of secondary and higher secondary education regarding the directors and supervisors of teachers during examinations nagpur news dag 87 amy