लोकसत्ता टीम

नागपूर: राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे एकूण ९८ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यात संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा सर्वाधिक कल असून, त्याशिवाय संगणकाशी संबंधित विदा विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अभ्यासक्रमांना पसंती मिळत आहे. राज्य समाइक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

यंदा राज्यभरात १ लाख ६० हजार ३४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी १ लाख ९२ हजार ३९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरलेल्या १ लाख ७६ हजार १११ विद्यार्थ्यांपैकी १ लाख २६ हजार ४५८ विद्यार्थ्यांना पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशाची संधी मिळाली आहे. राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये गेल्या काही वर्षांत अभियांत्रिकीअंतर्गत विविध अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. त्यात फाईव्ह जी तंत्रज्ञानापासून टेक्सटाइलपर्यंतच्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यातही संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमांची संख्या जास्त आहे.

आणखी वाचा-एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीला धमकी, म्हणाला “तर चेहऱ्यावर …”

संगणकशास्त्र, कृत्रिम बुद्धिमत्तेला सर्वाधिक पसंती

सीईटी सेलने दिलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक २२ हजार ६५८ विद्यार्थ्यांना संगणक अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश जाहीर झाला. त्या खालोखाल इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीसाठी १४ हजार ७४७, मॅकेनिकल अभियांत्रिकीसाठी १४ हजार २६९, माहिती तंत्रज्ञान अभ्यासक्रमासाठी ११ हजार ३३, स्थापत्य अभियांत्रिकीसाठी ९ हजार ८१४, विद्युत अभियांत्रिकीसाठी ८ हजार ७० विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. त्याशिवाय संगणकाशी संबंधित अभ्यासक्रमांनाही विद्यार्थ्यांची पसंती असल्याचे दिसते. त्यानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदा विज्ञान अभ्यासक्रमासाठी ५ हजार ७६८, संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकीसाठी (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यंत्रशिक्षण) ३ हजार ४४७, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदा विज्ञान अभ्यासक्रमासाठी २ हजार १८६, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि विदा विज्ञान अभ्यासक्रमासाठी २ हजार १६२, संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी (विदा विज्ञान) अभ्यासक्रमासाठी २ हजार १२७, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियांत्रिकीसाठी १ हजार ९७८, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणकशास्त्र १ हजार ७४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला.

आणखी वाचा- अमरावती : खळबळजनक! १५ वर्षीय मुलीवर निर्जनस्थळी अत्याचार

हे अभ्यासक्रम बंद होण्याच्या मार्गावर

काही अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसते. त्यानुसार फायर इंजिनिअरिंग, ऑइल फॅट्स अँड वॅक्सेस टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी आठ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगला १७६२ वेळा पसंती मिळाली, तर फक्त १६३ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. केमिकल इंजिनिअरिंगसाठी ३० हजार ८१३ पर्याय आले आणि १३८८ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. सिव्हिल इंजिनिअरिंगचा पर्याय दोन लाख ०३ हजार १३३ वेळा देण्यात आला आणि ९८१४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी दोन लाख २९ हजार ९४० पर्यायांची नोंद होत ८०६० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला.