नागपूर : ज्ञान सर्वांसाठी समान आहे. ते जिज्ञासूंना आणि बुद्धिमानांना द्यायचे असते. सज्जनांचे ज्ञान जगाला उपयोगी पडते. त्यामुळे ज्ञानाच्या ‘पेटंट’ची गरज काय, असा सवाल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला. कान्होलीबारा येथील आर्यभट्ट ॲस्ट्रोनॉमी पार्क येथे नवनिर्मित ‘वार’ यंत्राचे उद्घाटन सरसंघचालकांच्या हस्ते गुरुवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते.
मोहन भागवत म्हणाले, आपल्याकडेही वैज्ञानिक दृष्टी होती. आपण त्याच आधारे पुढे गेलो. दरम्यानच्या काळात आपल्या देशावर आक्रमणे झाली आणि आपण अस्थिर झालो. परिणामी, आपली व्यवस्था नष्ट झाली. ज्ञानाची परंपराही खंडित झाली. म्हणूनच आजची स्थिती निर्माण झाली. प्रत्येक विषयाचा शोध घेण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काही ना काही केले आहे. ते परंपरेतून आले आहे.
हेही वाचा – नागपूर : मारहाण करून प्रेयसीवर बलात्कार
आमचा देश जगातील सर्वात जुना देश आहे. आजच्या गणनेच्या आधारे, जे नवीन पुरावे आले आहेत, ते पाहता आपल्या समाजाचे वय १२ हजार वर्षांपूर्वीचे आहे. हा हिशोब बघितला तर कलियुगाची ५१२४ वर्षे झाली आहेत. त्यापूर्वी तीन युगे होऊन गेली आहेत, असेही डॉ भागवत म्हणाले.
हेही वाचा – तापमानात चढउताराचा आरोग्याला फटका ; सहा ते सात मार्चदरम्यान पावसाचा इशारा
पूर्वी आपल्याकडे ग्रंथ नव्हते. मौखिक परंपरा होती. नंतर ग्रंथ आले, ते ग्रंथ इकडून तिकडे गेले. परंतु, काही स्वार्थी लोकांनी पुस्तकात असंबंध गोष्टी टाकल्या. जे पूर्णपणे चुकीचे आहे. त्या पुस्तकांचा, ज्ञानाचा, त्या परंपरांचा पुन्हा एकदा आढावा घेणे आवश्यक आहे. पुनरावलोकन केल्यानंतर जो या कसोटीवर उभा राहील तो विज्ञान आणि धर्म असेल, असेही भागवत म्हणाले.