अकोला : स्वस्त धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. मात्र, अद्यापही २६ टक्क्यांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी ई-केवायसी केली नाही. त्यांचे धान्य बंद होण्याचा धोका निर्माण झाला आहे.अकोला जिल्ह्यामध्ये एकूण १२ लाख ९४ हजार ६०८ लाभार्थी असून त्यापैकी नऊ लाख ५४ हजार ७८७ लाभार्थ्यांनी त्यांची ईकेवायसी पूर्ण केली आहे. अद्यापही तीन लाख ३९ हजार ८२१ पात्र लाभार्थ्यांनी ईकेवायसी केलेली नाही. यामध्ये अकोला तालुक्यात ७५ हजार ३५३, अकोला शहर ४७ हजार ६१२, अकोट ३५ हजार ७३७, बाळापूर ४३ हजार ६०३, बार्शीटाकळी ३६ हजार ७३४, मूर्तिजापूर ३८ हजार ४६१, पातुर ३० हजार २९४ व तेल्हारा तालुक्यातील ई-केवायसी न केलेली लाभार्थी संख्या ३२ हजार ०२८ आहे. पात्र शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी पुर्ण करून घेणे आवश्यक आहे.

शासनाने ई-केवायसी करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली असून यापुढे मुदतवाढ मिळणार नसल्याचे पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. ई-केवायसी न केल्यास धान्याचा लाभ बंद होणार आहे. पात्र लाभार्थींनी धान्य घेत असलेल्या किंवा नजिकच्या रास्तभाव दुकानामध्ये जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेता येईल. या शिवाय ई-केवायसी करण्यासाठी शासनाचे ‘मेरा ई-केवायसी’ हे ॲप मोबाइलमध्ये डाऊनलोड करून त्याद्वारे देखील ईकेवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

७४ टक्के लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण

अकोला तालुक्यात एक लाख ५३ हजार ९०९, अकोला शहर एक लक्ष ३५ हजार ७५९, अकोट तालुक्यात एक लाख ३३ हजार १०८, बाळापूर एक लाख २५ हजार ६१५, बार्शीटाकळी एक लाख ०५ हजार ७१०, मूर्तिजापूर एक लाख ०३ हजार ५९२, पातूर तालुक्यात एकूण लाभार्थी संख्या एक लाख २४ हजार ८०१ असून ई-केवायसी झालेली एकूण लाभार्थी ९४ हजार ५०७, तेल्हारा तालुक्यात एकूण लाभार्थी संख्या एक लाख ३४ हजार ६१५ असून ई-केवायसी झालेली एकूण लाभार्थी एक लाख ०२ हजार ५७८ आहे. ईकेवायसीची टक्केवारी ७६.२० आहे.

कुटुंबातील सदस्यांचे सर्व मार्गाचे उत्पन्न ग्राह्य धरणार

अपात्र शिधापत्रिकाधारक शोध मोहिमेंतर्गत कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सर्व मार्गानी मिळणाऱ्या एकूण वार्षिक उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल, त्यासाठी उत्पन्नाचा दाखला अर्जासोबत सादर करावा लागेल.