लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाने राज्यात अवकाळी पावसाची स्थिती निर्माण केली. शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक ठरणारा हा पाऊस आता थांबला आहे. मात्र, पाऊस परतताच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने थंडीच्या आगमनाचे संकेत दिले आहेत. उत्तर भारतात अजूनही थंडीची लाट कायम आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे राज्यातील थंडीसाठी कारणीभूत ठरणार आहेत. मध्य आणि पूर्व भारतात येत्या ४८ तासात तापमानात घट होणार आहे. पुढील दोन दिवसात मध्य आणि पूर्व भारतातील तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता खात्याने वर्तवली आहे.

राज्याच्या विविध भागात किमान तापमानात घट होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात येत्या १९ जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. कमाल तापमान देखील कमी होण्याची शक्यता असून २५ जानेवारीपर्यंत थंडी अधिक राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. राज्यात उशिराने थंडीची सुरुवात झाली. मात्र, गुलाबी थंडीचा आनंद फार काळ टिकला नाही आणि अवकाळी पावसाने ठाण मांडले. या पावसाने शेतकऱ्याचेही मोठे नुकसान केले. अवकाळी पावसाचे सावट सध्या दूर झाले आहे आणि पुन्हा एकदा थंडीची आनंदवार्ता मिळाली आहे.

आणखी वाचा-राम मंदिर, लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, भाजप- संघाची नागपुरात बैठक सुरू

राज्यातील हवामानात सध्या कोणताही बदल नसून हवामान कोरडे राहणार आहे. थंडीचा परिणाम विदर्भात देखील जाणवणार आहे आणि विदर्भातील थंडीसाठी मध्यप्रदेशकडून येणारे थंड वारे कारणीभूत आहेत. त्यामुळे येथेही येत्या दोन-तीन दिवसात किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परिणामी येथेही थंडीची चाहूल जाणवेल. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशभरातच थंडीचा पारा घसरणार आहे. पुढील तीन दिवस उत्तरेकडे थंडीची लाट दिसून येणार आहे. मध्य आणि पूर्व भारतात येत्या ४८ तासात दोन ते तीन अंश सेल्सिअसने तापमानात घट दिसून येईल. दरम्यान मंगळवारपर्यंत पुन्हा एकदा नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होऊ शकतो आणि त्यानंतर देशातील हवामानात बदल घडून येऊ शकतो, असाही अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.