नागपूर : व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक करून कॉन्टक्ट लिस्टमधील मित्र, नातेवाईकांकडे आर्थिक मदतीची मागणी झाल्याचा प्रकार समोर आला. वन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अजय पाटील यांचा व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक झाला होता.

अजय पाटील यांच्या व्हॉट्सॲप नंबरवरून त्यांच्या एका मित्राला व्हॉट्सॲप ॲपवर दुपारी १२.४२ वाजता एक मॅसेज आला. तुमची मदत हवी आहे, असे त्यात म्हटले होते. त्यावर मित्राने नक्कीच असे उत्तर दिले. त्यानंतर पाटील यांच्या व्हॉट्सॲप नंबरवरून पुन्हा संदेश आला. मला माझ्या मित्राला २० हजार रुपये ट्रान्सफर करायचे आहे. पण माझ्या बँक अकांऊटमध्ये काहीतर प्राब्लेम झाले आहे. त्यामुळे रक्कम ट्रान्सफर होत नाही आहे. तुम्ही ते करू शकाल काय. मी तुम्हाला उद्या, सकाळी पैसे परत करतो.

मित्राला शंका आली आणि लगेच त्याने पाटील याने फोन कॉन केला. काय झाले म्हणून विचारले तर त्यांनी पैसे मागितलेच नव्हते. त्यांच्या नावे कोणीतरी दुसरी व्यक्ती पैसे मागत असल्याचे समजले. त्यानंतर अधिक तपास केला असता अनेकांना अशाप्रकारे पैसे मागण्यात आल्याची बाब समोर आली. व्हॉट्सॲप अकाऊंट हॅक झाल्यास काय करावे? यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसचे फॅक्ट चेकर अंकिता देशकर यांनी काही तज्ञांशी चर्चा केली.

व्हॉट्सॲप अकाऊंट कसे हॅक होतात?

प्रोफेशनल हॅकर आणि हॅकिंगफ्लिक्सचे संस्थापक गौतम कुमावत यांच्या मते, व्हॉट्सॲप हॅकिंग हा वाढता धोका आहे आणि हल्लेखोर सोशल इंजिनिअरिंग, टेक्निकल कारनामे आणि सिम-आधारित हल्ल्यांचा वापर अकाऊंट हायजॅक करण्यासाठी करतात.

हॅकिंग पद्धती

व्हॉट्सॲप वेब हायजॅकिंग : जर एखाद्या हल्लेखोराने पीडितेच्या फोनमध्ये थोडक्यात प्रवेश मिळवला तर ते खाते व्हॉट्सॲप वेबशी लिंक करू शकतात आणि रिमोट ॲक्सेस ठेवू शकतात.

कॉल मर्जिंग स्कॅम : एक स्कॅमर तुम्हाला फोन करतो आणि दावा करतो की त्यांना तुमचा नंबर एका परस्पर मित्राकडून मिळाला आहे. त्यानंतर ते तुम्हाला कॉल दुसऱ्या नंबरवर विलीन करण्यास सांगतात, म्हणजे ‘फ्रेंड’. एकदा विलीन झाल्यानंतर आपण नकळत पणे स्वयंचलित व्हॉट्सॲप ओटीपी व्हेरिफिकेशन कॉलशी कनेक्ट होतो. स्कॅमर ओटीपी ऐकतो आणि आपल्या खात्यात प्रवेश मिळवतो.

हॅकिंग पासून सुरक्षित कसे राहावे?

कुमावत यांनी व्हॉट्सॲप अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी टिप्स शेअर केल्या आहेत.
-अनोळखी लोकांशी कॉल कधीही विलीन करू नका
-फोन करणाऱ्यांची ओळख नेहमी पडताळून पहा
-व्हॉट्सॲपवर, अगदी प्रायव्हेट चॅटमध्येही पर्सनल डिटेल्स शेअर करू नका
-संशयास्पद लिंकवर क्लिक करणे टाळा
-आपल्या डिव्हाइसवर प्राप्त ओटीपी कधीही शेअर करू नका
-अतिरिक्त सुरक्षेसाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन सक्षम करा
-अनधिकृत हस्तांतरण रोखण्यासाठी सिम पिनचा वापर करा
-व्हॉट्सॲप वेबमध्ये लिंक केलेले डिव्हाइस नियमितपणे तपासा
-बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन (फेस आयडी किंवा फिंगरप्रिंट) सक्षम करा
-गोपनीयता सेटिंग्ज प्रतिबंधित करा- शेवटचे पाहिलेले आणि प्रोफाइल चित्र अज्ञात नंबरपासून लपवा
-अनपेक्षित ओटीपी मिळाल्यास ताबडतोब १९३० (नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन) वर कॉल करा