Rashtriya Swayamsevak Sangh Marks 100 Years : इस्रायल आणि हमासमधील युद्ध संपुष्टात यावे, यासाठी जगभरातून प्रयत्न होत आहेत. गाझामधील निरपराध पॅलेस्टिनींचे हत्याकांड थांबावे, हमासकडील ओलिसांची सुटका व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रांसह अमेरिका, युरोपमधील पाश्चिमात्य राष्ट्रे आणि इजिप्त, कतारसारखी मुस्लिमबहुल राष्ट्रे प्रयत्न करीत आहेत. मात्र या प्रयत्नांना अद्याप यश आलेले नाही. या युद्धामुळे सर्व जग चिंतेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपूर येथे संघाच्या विजयादशमी सोहळ्यात भाषण करताना यावर चिंता व्यक्त केली.
इस्रायल आणि हमासच्या युद्धावर सरसंघचालक काय म्हणाले
ऑक्टोबर २०२३ पासून गाझा पट्टी आणि इस्रायलमध्ये इस्रायल आणि हमासच्या नेतृत्वाखालील पॅलेस्टिनी दहशतवादी गटांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू आहे. २००८ पासून हे गाझा-इस्रायल संघर्षाचे पाचवे युद्ध आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण लष्करी सहभाग आहे. यावर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी चिंता व्यक्त केली. स्वार्थ आणि अहंकारातून हे युद्ध सुरू आहे. याचे जगावर काय परिणाम होतील हे कुणीच सांगू शकत नाही, अशी चिंता व्यक्त केली.
हेही वाचा – नागपुरात लोटला भीम सागर, निळ्या रंगाच्या सम्यक पताकांनी सजली दीक्षाभूमी
बांगलादेश म्हणतो भारतापासून भीती
यावेळी सरसंघचालकानी बांगलादेशमधील परिस्थितीवर मोठे भाष्य केले. बांगलादेशात झालेल्या हिंसक सत्तापालटाची तात्कालिक आणि स्थानिक कारणे हा त्या विकासाचा एक पैलू आहे. पण हिंदू समाजावर नाहक पाशवी अत्याचाराची परंपरा पुन्हा एकदा आली. त्या अत्याचारांच्या निषेधार्थ, तेथील हिंदू समाज यावेळी संघटित झाला आणि बचावासाठी घराबाहेर पडला, त्यामुळे काही प्रमाणात संरक्षण मिळाले. पण जोपर्यंत हा अत्याचारी मूलतत्त्ववादी स्वभाव तेथे आहे तोपर्यंत तेथील हिंदूंसह सर्व अल्पसंख्याक समाजाच्या डोक्यावर धोक्याची टांगती तलवार राहणार आहे. त्यामुळेच त्या देशातून भारतात होणारी बेकायदेशीर घुसखोरी आणि परिणामी लोकसंख्येचा असमतोल हा देशातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. या अवैध घुसखोरीमुळे परस्पर सौहार्द आणि देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बांगलादेशात अल्पसंख्याक बनलेल्या हिंदू समाजाला औदार्य, मानवता आणि सद्भावना यांना पाठिंबा देणाऱ्या सर्वांची, विशेषतः भारत सरकार आणि जगभरातील हिंदूंची मदत आवश्यक आहे. असंघटित आणि दुर्बल राहणे म्हणजे दुष्टांच्या अत्याचारांना आमंत्रण देणे, हा धडा जगभरातील हिंदू समाजानेही घेतला पाहिजे. पण प्रकरण इथेच थांबत नाही. आता भारतातून सुटण्यासाठी पाकिस्तानला भेटल्याची चर्चा आहे. अशा चर्चा घडवून भारतावर कोणकोणत्या देशांना दबाव आणायचा आहे, हे सांगण्याची गरज नाही. त्याची उपाययोजना हा शासनाचा विषय आहे असे भागवत म्हणाले.