वर्धा : प्रथम बिना फोटोचे तर आता नेत्यांच्या फोटोसह अर्ज सादर करण्याचे निमंत्रण आले आहे. आर्वीचे भाजपचे आमदार दादाराव केचे यांना अद्याप पक्षाने उमेदवार घोषित केले नाही. मात्र तरीही केचे यांनी २८ तारखेस अर्ज दाखल करणार असल्याचे स्पष्ट करीत समर्थक व मतदारांना हजर राहण्याची विनंती केली आहे. नवे निमंत्रण देताना त्यांनी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांचे फोटो देत अर्ज भरण्यास येण्याचे आवाहन मतदारसंघात केले. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना एकामागून एक आव्हान देणारे केचे हे राज्यातील भाजपचे एकमेव आमदार असल्याची चर्चा जिल्हा भाजप गोटात सुरू झाली आहे.

आता दुसऱ्या एका घडामोडीत माजी खासदार रामदास तडस यांना मध्यस्थ म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. लोकसत्ता सोबत बोलताना ते म्हणाले, हे खरं आहे. केचे यांना घेऊन मी नागपूरला निघणार आहे. तर केचे म्हणाले की तडस यांच्यासोबत मी जाणार आहे. सायंकाळी सहा वाजता तडस व मी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना भेटणार. भेटायला काय हरकत, असे ते म्हणतात. पण मीच पक्ष व मीच अपक्ष पण. आर्वी भाजप म्हणजे दादाराव केचे. सर्व समाज सोबत घेऊन चालणारा असा, अशी प्रतिक्रिया केचे यांनी दिली.

हेही वाचा – काटोलमध्ये याज्ञवल्क्य जिचकार यांच्या उमेदवारीला कोणाची फूस ? तर्कवितर्क

हेही वाचा – महाविकास आघाडीचा घोळ कायम, काँग्रेस इच्छुक असलेली हिंगणा विधानसभाही राष्ट्रवादीकडे

आर्वीत काँग्रेसनंतर भाजप वर्तुळात आता नाट्यमय घडामोडी घडू लागल्या आहेत. विविध घटना पुढे येत असून त्याकडे सर्व लक्ष ठेवून आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय अजमिरे म्हणतात की, आर्वीची निवडणूक प्रचंड चर्चेची झाली आहे, यात दुमत नाहीच. केचे यांचे तगडे स्पर्धक असलेले सुमित वानखेडे या घडामोडीवर भाष्य करीत नाही. पण केचे कधी जाहीर तर कधी खाजगी गोटात भाष्य करतात. त्यांना विधान परिषद सदस्य तसेच अपेक्षित काही देण्याची तयारी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दर्शविली. त्यावर विचार करण्यास वेळ पण दिला. पण केचे यांनी स्पष्ट केले की तिकीट देण्याऐवजी जे तुम्ही मला देण्याचे आश्वासन देत आहात, ते तुम्ही त्याला (वानखेडे) देत मला का तिकीट देत नाही, असा केचे यांचा सवाल झाल्याचे त्यांच्या बैठकीतील एकाने नमूद केले.