मंगेश राऊत
पोलीस भरतीचा मुहूर्त सरकारला सापडत नसल्याने तरुणाई संतप्त झाली असून आता या संदर्भात थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ट्वीटर खात्यावर विचारणा केली जात आहे.
करोना साथीने सर्व जग ढवळून निघाले असून देशात करोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. पुन्हा देशातील काही राज्यांमध्ये अंशत: टाळेबंदीचे निर्णय घेण्यात आले. करोनामुळे समाजातील बेरोजगारी वाढली असून खासगी कंपन्या मनुष्यबळ कमी करण्यावर भर देत आहेत. आता बेरोजगार तरुणाईची भिस्त सरकारी नोकरीवर असून बारावीपर्यंत शिक्षण घेतलेले तरुण, तरुणी सैन्य व पोलीस दलाला प्राधान्य देत आहेत. पण, जवळपास तीन वर्षांपासून राज्यात पोलीस भरती झालेली नाही. आता राज्य सरकारने १२ हजार ५०० पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे जाहीर केले. पहिल्या टप्प्यात ८ हजार ५०० पोलिसांची भरती करू, अशी घोषणा सरकारने केली. मात्र वर्ष उलटल्यांनतरही कोणतीच हालचाल नसल्याने तरुणाईमध्ये दिवसेंदिवस असंतोष पसरत आहे. आता हे तरुण गृहमंत्री यांच्या ट्वीटर खात्यावर ‘पोलीस भरती केव्हा घेणार?’ असा सवाल करू लागले आहेत.
२०१९ मध्ये पोलीस भरतीकरिता उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात आले होते. या अर्जांची छाननी, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रिया (ओएमआर) पूर्ण करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून निविदा मागवण्यात येतील. हे कंत्राट देण्यात आल्यानंतर परीक्षा घेण्यासाठी प्रक्रिया सुरू होईल. परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाईल. निविदा प्रक्रियेला १५ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
– संजय कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक.