नागपूर : तब्बल बारा वर्षांनी पदभरती होणाऱ्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातील ८१ पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) जाहिरात देण्यात आली. यासाठी राज्यातील लाखो उमेदवारांनी अर्जही केले. मात्र, दहा महिन्यांचा कालावधी उलटूनही आयोगाकडून सामाजिक न्याय विभागाच्या परीक्षेची तारीख जाहीर न झाल्याने विद्यार्थी  आणि पालक चिंतेत आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एमपीएससी’कडून साहाय्यक आयुक्त समाज कल्याणच्या गट अ, ब आणि गृहप्रमुख गट ब या पदांच्या ८१ रिक्त जागांसाठी नोकरभरती जाहीर करण्यात आली होती. तब्बल १२ वर्षांनी या विभागातील रिक्त पदांसाठी नोकरभरती होत आहे. ५ ते १५ जून २०२३ या दरम्यान परीक्षेच्या अर्जाची मुदत होती. या वेळी राज्यातील लाखो विद्यार्थ्यांनी पदभरतीसाठीही अर्ज केले. यासाठी आवश्यक शुल्कही भरले आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आयोगाकडून परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, दहा महिने उलटूनही आयोगाकडून सामाजिक न्याय विभागातील पदांच्या परीक्षेबाबत कुठलीही माहिती दिली जात नाही.

हेही वाचा >>>वाशिम : विहिरीत अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकले…

विद्यार्थ्यांची चिंता वाढल्याने ते एमपीएससीच्या मदत केंद्रावर संपर्क  करीत आहेत. परंतु, येथूनही त्यांना कुठलाही दिलासा मिळत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागात आधीच अनेक पदे रिक्त असल्याने प्रशासनावर कामाचा ताण आहे. त्यामुळे या विभागात पदभरती होणे आवश्यक आहे. मात्र, ‘एमपीएससी’कडून परीक्षेसंदर्भात कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. परीक्षेसंदर्भात एमपीएससीच्या सचिवांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

‘एमपीएससी’ने सप्टेंबर महिन्यात समाजकल्याण अधिकारी पदासाठी अभ्यासक्रम जाहीर केला. मात्र, अद्यापही परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येत आहे. आयोगाने तात्काळ परीक्षेची तारीख जाहीर करावी. – बळीराम डोळे, विद्यार्थी प्रतिनिधी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When is the social justice and special assistance department exam students parents are worried as the date is not announced amy
Show comments