लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : ‘‘जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।। रामदूत अतुलित बल धामा। अंजनि-पुत्र पवनसुत नामा।। ’’ हनुमान चालिसाचा एक एक शब्द इतका प्रभावी आहे की, तो जितक्यांदा तुम्ही उच्चाराल, त्या प्रत्येकवेळी आयुष्यातील प्रत्येक अडचण दूर जाईल. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील निमढेला क्षेत्रावर राज्य करणारा ‘छोटा मटका’ च्या बाबतीत हा प्रत्यय वारंवार येतो. हनुमानासमोर श्रद्धेने मान झुकवताना आणि मंदिराची जणू सुरक्षा करत असल्याच्या अविर्भावात असलेल्या ‘छोटा मटका’ची ही ध्वनीचित्रफित वन्यजीव अभ्यासक अरविंद बंडा यांनी तयार केली.

आणखी वाचा- संत्रा उत्पादक संकटात, सरकारच्‍या चुकीच्‍या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका

आणखी वाचा- ‘‘समस्या काय सोडवणार, सरकारच एक…’’; अकोल्यात कांद्याची होळी, शेतकरी संघटना आक्रमक

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील निमढेला क्षेत्र म्हणजे ‘छोटा मटका’ या वाघाचा अधिवास आणि या अधिवासातून तो जेव्हाही बाहेर पडतो, तेव्हा या क्षेत्रातील हनुमानाच्या मंदिरासमोर आधी नतमस्तक होतो. माणसांपेक्षाही निरपेक्ष भक्तीभाव त्याच्या ठायी असल्याचे तो वारंवार दाखवून देतो. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील ‘छोटी तारा’ आणि ‘मटकासूर’ यांचा तो अपत्य. आठवड्याच्या उत्तरार्धात तो हमखास रामदेगीच्या मंदिरातही जातो. त्यात त्याचा कोणताही स्वार्थ नसतो. येथे येणाऱ्या भाविकांचा त्याच्याशी अनेकदा सामनाही होतो, पण त्याने कधी पर्यटकावर हल्ला केल्याचे आजतागायत ऐकिवात नाही. कित्येकदा तो वनरक्षकांच्या कुटीजवळही जाऊन बसतो. जणू वनरक्षकांसोबत जंगलाच्या सुरक्षेची जबाबदारी त्याचीच आणि हीच जबाबदारी पार पाडण्यासाठी तो हनुमानासमोर देखील नतमस्तक होतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When the tiger of nimdhela says jai hanuman gyan gun sagar rgc 76 mrj