नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षा २०२३ ची तात्पुरती निवड यादी अद्याप जाहीर झालेली नाही. आयोगाने २६ सप्टेंबर २०२४ रोजी मुलाखतीनंतरची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ११ मार्च ते १८ मार्च २०२५ या कालावधीत उमेदवारांना पदांसाठी प्राधान्यक्रम भरण्याची संधी देण्यात आली. मात्र, त्या प्रक्रियेला दोन आठवडे उलटूनही निवड यादी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे उमेदवारांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी वाढली आहे.

राज्यसेवा २०२३ ची प्रक्रिया सुरू होऊन दोन वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. जाहिरात २४ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ४ जून २०२३ रोजी पूर्व परीक्षा झाली. मुख्य परीक्षा २० ते २२ जानेवारी २०२४ दरम्यान पार पडली असून १६ जुलै २०२४ रोजी निकाल जाहीर झाला. १ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२४ या कालावधीत वैद्यकीय तपासणी झाली, तर १३ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर २०२४ दरम्यान मुलाखती पूर्ण झाल्या. यानंतर उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेण्याची प्रक्रिया १८ मार्च २०२५ रोजी संपली आहे. तरीही निवड यादी आणि त्यानंतर अद्याप अंतरिम निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. निकाल विलंबामुळे उमेदवारांना मोठ्या प्रमाणात मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे.

भविष्यातील अनिश्चिततेमुळे अनेक उमेदवारांच्या शंका वाढल्या असून, आयोगाच्या विलंबित प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आणि असंतोष निर्माण झाला आहे. आयोगाने लवकरात लवकर अंतरिम निकाल जाहीर करून उमेदवारांची प्रतीक्षा संपवावी, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे. यासंदर्भात निवड यादीची प्रक्रिया सुरू असून लवकरच यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या आठवड्यात जाहीर नक्की जाणार होणार आहे अशीही माहिती आहे. तसेच त्यानंतर लगेच आप्टींग आउटची प्रक्रियाही सुरू होणार आहे.

नियुक्तीची प्रक्रिया लांबणार

‘एमपीएससी’ने प्राधान्यक्रम भरण्याचा पर्याय दिल्यानंतर तात्पुरती निवड यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (ऑप्टिंग आऊट) पर्याय दिला जातो. यानंतर अंतरिम जाहीर प्रसिद्ध केली जाऊन शिफारस पत्रे दिली जातात. त्यानंतर उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होतो. परंतु, सध्या प्राध्यान्यक्रमानंतरची संपूर्ण प्रक्रिया लांबल्याने नियुक्तीचा मार्ग अजून खडतर आहे.