MPSC combine exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संयुक्त गट-ब व गट-क-२०२४ च्या जाहिरातीची स्पर्धा परीक्षार्थी चातकाप्रमाणे वाट बघत असताना वर्ष उलटूनही अद्याप पदभरतीची चिन्हे दिसत नसल्याने उमेदवारांची चिंता वाढली आहे. मराठा आरक्षणामुळे जाहिरातीत बदल करायचा असे कारण मिळत असले, तरी एकंदरीतच बेरोजगारांच्या बाबतीत सरकारचे वेळखाऊ धोरण याला जबाबदार आहे. संयुक्त गट-ब आणि गट-क परीक्षेची जाहिरात येत्या पंधरा दिवसांत प्रसिद्ध करावी. अन्यथा, उमेदवारांकडे आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिला आहे. यासंदर्भात एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, संयुक्त परीक्षेमध्ये बरीच पदे असून काही पदांचे मागणीपत्र अद्याप प्राप्त झालेली नाहीत. मागणीपत्र येताच जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे उमेदवारांनी तयारी सुरू करावी.
‘एमपीएससी’च्या वतीने राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा दरवर्षी घेतली जाते. संयुक्त परीक्षेच्या मागील वर्षी सात हजारांवर जागांसाठी जाहिरात आली होती. एप्रिल २०२३ मध्ये यासाठी परीक्षाही घेण्यात आली. यावर्षीही जवळपास आठ हजार जागांसाठी ही जाहिरात येईल या अपेक्षेने विद्यार्थी परीक्षेची तयारी करत आहेत. राज्याच्या अनेक भागातील विद्यार्थी हे पुणे, मुंबई, नागपूर अशा मोठ्या शहरांमध्ये जाऊन परीक्षेची तयारी करतात. यासाठीचा मोठा आर्थिक भार त्यांना सहन करावा लागतो. त्यात परीक्षा वेळेत न झाल्याने उमेदवारांवर दडपण वाढत जाते. जून महिन्यापर्यंत ‘एमपीएससी’कडून संयुक्त परीक्षेची जाहिरात येणे अपेक्षित होते. मात्र, ऑगस्ट उजाळूनही जाहिरात न आल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तात्काळ जाहिरात काढावी अन्यथा आंदोलन करू असा इशाराही दिला.
हेही वाचा – नागपुरातील १० ठाणेदारांच्या बदल्या; अवैध व्यावसायिकांशी संबंध भोवले…
हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर शेतकरी आत्महत्येचे… रविकांत तुपकर म्हणाले..
नवीन आरक्षणानुसार मागणीपत्राचा प्रश्न
राज्यात मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर अनेक जाहिराती आणि मागणीपत्रांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिताच्या (एसईबीसी) नव्या आरक्षणानुसार पदसंख्या आणि आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्रे प्राप्त झाल्यानंतरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असे पत्रक आयोगामार्फत २७ जून २०२४ रोजी काढण्यात आले होते. परंतु आता ऑगस्ट महिना संपायला आला तरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली नाही. त्यामुळे चिंता वाढत आहे. काही महिन्यांपासून वरीलपैकी अशी अनेक कारणे स्पर्धा परीक्षा उमेदवारांना ऐकायला मिळत आहेत. लवकर जाहिरात प्रसिद्ध झाली नाही, तर काहींची वयोमर्यादा संपण्याची भीती आहे. जाहिरात प्रसिद्ध करण्यास अति विलंब होत असल्याने उमेदवारांमध्ये नैराश्य आणि संताप पसरलेला आहे. त्यामुळे राज्य सरकारशी समन्वय साधत सदर जाहिरात तत्काळ प्रसिद्ध करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.