नागपूर : रेल्वेने मनुष्यबळ कमी करण्याच्या धोरणामुळे रेल्वेस्थानकावरील जनरल तिकीट विक्री खिडकी (काऊंटर) लुप्त करण्याकडे वाटचाल केली आहे. मध्य भारतातील अत्यंत महत्त्वाच्या नागपूर स्थानकावरील संत्रा मार्केट प्रवेशद्वाराकडील तिकीट विक्री खिडकी बंद करीत आता केवळ एकमेव जनरल तिकीट विक्री खिडकी उरली आहे. त्यामुळे खिडकीसमोर कायम रांगा दिसू लागल्या असून प्रवाशांना गाडी पकडताना दमछाक होत आहे.
रेल्वेने जनरल तिकीट विक्रीसाठी ‘यूटीएस ॲप’ तयार केले आहे. या ॲपमधून प्रवाशांनी तिकीट खरेदी करावे, असा प्रशासनाचा आग्रह आहे. असे करताना रेल्वेने सगळ्यांकडे ‘स्मार्ट फोन’ असल्याचे आणि तो त्यांना सहज हाताळता येतो हे गृहीत धरले आहे. एवढेच नव्हे तर प्रवाशाला ‘ॲप’च्या ‘व्हॅलेट’मध्ये किमान शंभर रुपये रक्कम जमा ठेवणे शक्य असल्याचेही मान्य केले आहे. कारण, तेथे किमान रक्कम असेल तरच तिकीट खरेदी करता येणार आहे. रेल्वेच्या या धोरणामुळे सामान्य, गरीब प्रवाशांना सर्वसाधारण तिकीट खरेदी करताना कित्येक मिनिटे रांगेत उभे राहावे लागते. त्यानंतर फलाटावर उभी असलेल्या रेल्वेकडे पळत सुटावे लागते. याचा वयोवृद्ध आणि महिला, मुलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा तर धावत-पळत गेल्याने जिन्यावरून पडण्याच्या घटना घडल्या आहेत, असे भारतीय प्रवासी यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला म्हणाले.
संत्रा मार्केट (पूर्व द्वार) येथे सर्वसाधारण तिकीट खरेदीसाठी एकच तिकीट काऊंटर आहे. यासंदर्भात भारतीय यात्री केंद्राकडे प्रवाशांच्या अनेक तक्रारी आल्या. बजेरिया, गणेशपेठ, बडकस चौक, सुभाष नगर, संत्रा मार्केट या ठिकाणच्या ट्रॅव्हलर्स तिकीट बुकिंगसाठी चार महिने आधी प्रवासी तिकीट बुक करतात. अनेक शारीरिकदृष्ट्या अपंग, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि कर्करोगाचे रुग्ण हे सर्व एकाच रांगेत उभे असल्याने काऊंटर बंद असल्याने अनेक प्रवासी तिकीट न काढताच परत जातात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ नाही. त्यामुळे बंद असणारे काऊंटर उघडावेत. जेणेकरून प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही, असेही शुक्ला म्हणाले.
हेही वाचा – वर्धा : अबब… तब्बल शंभर संघटना झाल्या शेतकऱ्यांसाठी संघटित, उद्देश काय? वाचा…
इतवारी रेल्वेस्थानकावरही प्रशासनाने ‘यूटीएस’चा वापर वाढावा म्हणून सर्वसाधारण तिकीट विक्रीसाठीची खिडकी बंद केली आहे. ‘यूटीएस’चा वापर करण्याबाबत प्रवाशांना आग्रह धरावा, असे निर्देश प्रशासनाने रेल्वे तिकीट तपासणीसांना (टीटीई) दिले आहेत, अशी माहिती प्राप्त झाली आहे. यासंदर्भात दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंह यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.