वर्धा: भाजपचे पक्ष सदस्य नोंदणी अभियान जोरात चालले. सुरवातीस मंदगती दिसून आली. मात्र वरिष्ठ नेत्यांनी कान पिळले आणि मग कोण पुढे जातो, याची स्पर्धाच सूरू झाली. अखेर हाश हुश करीत नोंदणी एकदाची आटोपली. आता राज्यात कोणत्या विधानसभा मतदारसंघात किती सदस्य पक्षात सामील झाले याची यादी आली आहे. राज्यात टॉप फाइव्ह म्हणजे नोंदणीत पहिले पाच असे आहेत. पनवेल १ लाख ६३ हजार, कामठी १ लाख ५४ हजार, बल्लारपूर १ लाख ३९ हजार, चिंचवड १ लाख ३३ हजार व कोथरूड १ लाख २२ हजार. सर्वात मागे पडलेले शेवटचे पाच मतदारसंघ असे आहेत. मालेगाव सेंट्रल ४ हजार, मेहकर ११ हजार, अक्कलकुवा १२ हजार, महाड १२ हजार व रिसोड १३ हजार.
विदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कामठी अव्वल तर सुधीर मूनगंटीवार दुसऱ्या स्थानी आहेत. वर्धा जिल्ह्यात गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा वर्धा मतदारसंघ अव्वल आहे. वर्धा ७० हजार, आर्वी ६३ हजार, हिंगणघाट ५० हजार व देवळी ४१ हजार अशी सदस्य नोंदणी झाली आहे.
सदस्य नोंदणी नंतर सक्रिय सदस्य नोंदणी मोहीम चालली. २ हजार झालेत. ५० प्राथमिक सदस्य नोंदणी करून घेणारा सक्रिय सदस्य झाला. १३, १४ व १५ या तीन दिवसात मंडळ स्तरावर बैठका व मंडळ प्रमुख ठरतील. त्यांची निवड झाली की या सर्वांची नावे बंद लिफाफ्यात मुंबईत प्रदेश कार्यालयास पोहचतील. त्यानंतर जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया सूरू होईल. यावेळी ती बदलण्यात आली आहे. पूर्वी प्रथम जिल्हाध्यक्ष व मग जिल्ह्यातील अन्य असे होत होते. जिल्हाध्यक्ष कोण होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहले आहे.
सदस्य नोंदणी सर्व पदाधिकाऱ्यांची परीक्षाच घेणारीच ठरल्याचे पहिल्या टप्प्यातील चित्र राहले. मुदतीत काम होत नसल्याने मुदतवाढ देण्यात आली. प्रथम १ ते १५ जानेवारी, दुसरी १५ ते ३१ जानेवारी व तिसरी १ ते १९ फेब्रुवारी अशी मुदतवाढ देण्यात आली. पदाधिकारी हे वारंवार नोंदणी अँप सहज हाताळता येत नसल्याची तक्रार करीत. म्हणून मग प्रत्येक गावात एक तंत्रस्नेही सेवक मदतीस देण्यात आला. नंतरच वेग आला. सर्व भाजप आमदार याच एका कामात लागल्याचे राज्यभरातील चित्र होते.