नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महानिर्मितीच्या कोराडीमध्ये प्रस्तावित १ हजार ३२० मेगावॅटच्या प्रकल्पाला विरोध केला होता. त्यापाठोपाठ आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रकल्पाला विरोध करत २९ मे रोजीची भर दुपारची जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली आहे.
गडकरी यांनी कोराडीतील नवीन प्रकल्पाच्या विषयावर उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. त्यांनी कोराडीतील प्रकल्प पारशिवनीला हलवण्याची मागणी केली होती. परंतु त्यावर अद्याप काहीही निर्णय झाला नाही. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून प्रकल्प आणि त्यासाठी भर दुपारी आयोजित सुनावणी रद्द करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा >>>नागपूर: कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पाला गडकरी पाठोपाठ काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचाही विरोध
पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या निवेदनात काँग्रेस सचिव संदेश सिंघलकर यांनी दिलेल्या निवेदनाचा दाखला देत या प्रकल्पामुळे नागरिकांचे आरोग्य कसे धोक्यात येईल, हे स्पष्ट केले आहे. महानिर्मितीने कोराडीतील जुन्या ६६० मेगावॅटच्या ३ प्रकल्पात प्रदूषण कमी करण्यासाठी फ्लू गॅस डिसल्फ्युरायझेशन (एफजीडी) लावले नाही. त्यामुळे प्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासाच्या तक्रारी वाढल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याने येथील नवीन प्रकल्पाला विरोध असल्याचे पाटोलेंनी कळवले. उन्हाळ्याच्या दिवसांत दुपारी १२.३० वाजता नागपुरातील कोरडीत जनसुनावणी आयोजित केली आहे. सध्या शहराचे तापमान ४६ अंश सेल्सिअसच्या जवळपास आहे. नागरिकांना उष्माघाताचा धोका बघता या जनसुनावणीला पाटोळे यांनी तीव्र विरोध केला असून ही जनसुनावणी रद्द करण्याची मागणी केली आहे.