चंद्रपूर: वरोरा तालुक्यातील पांझुर्णी या गावात १७ व्या शतकातील प्राचीन सती मंदिर आहे. सतीची मूर्ती असलेले देशातील हे एकमेव मंदिर असावे, असा इतिहासकारांचा दावा आहे. इतर मंदिरासमोर सतीची समाधी असते. पांझुर्णीचे मंदिर याला अपवाद  आहे. या मंदिराकडे शिल्पकलेचा उत्कृष्ट कलाविष्कार म्हणूनसुद्धा बघितले जाते. गावातील ठाकरे कुटुंबींयाचे हे मंदिर कुलदैवत आहे. ते रोज या मंदिरात पूजाअर्चा करतात. या मंदिरांची नोंद इग्रजांनी चंद्रपूर जिल्हयाच्या गॅझेटमध्ये केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस्थानातून तीन हजारावर राणे राजपुत वऱ्हाडात आहे. त्याची नोंद १८८१ च्या इंग्रजांनी केलेल्या जनगणनेत आहे. ठाकूर कुळातील राजपूत भास्कर वर्मा जोधपूरच्या गादीवर होता. त्याचा वंशज अमरावती जिल्हयात आला. तो राजस्थानातील तिरोळा प्रदेशातील होता. कालांतराने ठाकूर कुळातील राजपूत पांझुर्णी येथे स्थायिक झाले. पुढे ठाकूर या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्यांना ठाकरे या नावाने संबोधण्यात येऊ लागले. ठाकरे घराण्याची शेती पांझुर्णी, वंधली, येवती, वाघनख, नांदरा, लोणगाडगा, नीलजई, केळी, एकोणा, मार्डा, निमसडा, कुंभा, पाचगाव, पांढरतळा येथे होती. त्यांनी आपल्या वंशांमध्ये सती जाण्याची प्रथा कायम ठेवली आहे. ठाकरे कुटुंबातील पूर्वजांकडे गडगंज संपत्ती होती. पूर्वजांपैकी गणाजी ठाकरे यांच्याकडे शेती, जमीन, गुरेढोरे अशी संपत्ती होती. परंतु त्यांना वारसदार नव्हता. त्याची पत्नी नवलाई हिच्या संमतीने दत्तकपुत्र घेण्याचे ठरले. त्यानुसार अमरावती जिल्हयातील जाधव कुटुंबातील नवलाईच्या भावाचा मुलगा गिरमा याला दत्तक घेण्याचे ठरले. दत्तक मुलगा केवळ पाच वर्षाचा होता. गणाजीची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यांना काळाने हिरावून घेतले. नवलाईसमोर अचानक संकट उभे झाले.

हेही वाचा >>>ॲट्रासिटी कायद्याचे उल्लंघन, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्र्यांना कायदेशीर नोटीस

त्यावेळेच्या कौटुंबिक प्रथा-

परंपरेनुसार तिला सती जाण्याचा निर्णय घ्यावा लागला. दत्तक लहान मुलगा आणि मोठी संपत्ती मागे ठेवून नवलाई सती गेल्या. तो काळ १७६० ते १७७० च्या दरम्यानचा होता. नवलाई ज्या जागेवर सती गेली तिथे तिच्या स्मृतीप्रित्यर्थ  दगडाचे पाच कळस असलेले भव्य मंदिर बांधण्यात आले. मंदिर राजस्थानी शिल्पकलेनुसार बांधण्यात आले. मंदिरात गणाजी आणि नवलाईच्या दगडी मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. हे मंदिर शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून ते सती मंदिर या नावाने प्रसिद्ध आहे. हेच सती मंदिर ठाकरे घरण्याचे आद्य दैवत बनले आहे.

हेही वाचा >>>फडणवीसांच्या उपस्थितीत पिठाधीश म्हणाले, चवदार वाटत असेल तर मांसाहार करायला हवा…

नवदांप्मत्याची भेट

सती मंदिरामुळे ठाकरे कुटुंबाला आपल्या पूर्वजांचा इतिहास प्राप्त झाला आहे. सती मंदिर संपूर्ण ठाकरे कुटुंबाची आराध्य दैवत आहे. ठाकरे कुळातील सदस्य उद्योग व्यवसायाकरिता किंवा नोकरीच्या निमित्ताने पांझुर्णी गाव सोडून दूर गेले आहेत. निरनिराळया क्षेत्रांत व शहरात ते स्थायिक झालेले आहेत. परंतु त्यांच्या घरी नवीन शुभ प्रसंग होत असल्यास पहिल्या दर्शनाकरिता पांझुर्णी येथील सती मंदिरात येतात.ठाकरे कुटुंबाच्या घरातील शुभ कार्य असेल अथवा नवीन लग्न होऊ घातले असेल तरी या मंदिरातील पूजा केली जाते. पहिली पूजा आणि अहीर पत्रिका या मंदिरात अर्पण केली जाते. लग्न झाल्यानंतर ठाकरे कुटुंबातील नवदांम्पत्य या ठिकाणी येऊन ओटी भरून पूजा अर्चा करीत असतात.

मी ठाकरे कुटुंबातील नव्या पिढीतील असून माझ्याकडे दहा वर्षापासून मंदिराच्या देखभालीची जबाबदारी आहे. मी रोज मंदिरातील मूर्तींची पूजा करत असतो. मूर्तींना रोज हार घालून त्यांचे वस्त्र बदलून पूजा केली जाते. घरातील शुभकार्याची सुरुवात याच मंदिरातून केली जाते. -लक्ष्मण पुंडलिक ठाकरे ,पुजारी तथा ठाकरे वंशज, पांझुर्णी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which district is the only temple in the country with an idol of sati located rsj 74 amy