अकोला: अकोला जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा पदभार असल्याने ते अकोल्याला वेळ देऊ शकत नसल्याचे चित्र आहे.
शासनाने नुकतेच परिपत्रक काढून ध्वजारोहणासाठी जिल्हानिहाय मंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात सात जिल्हा मुख्यालय अपवाद असून त्याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. अकोला जिल्ह्याच्या नशिबी ध्वजारोहणालाही मंत्री नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अकोला जिल्ह्याला २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. चार वर्षांपासून जिल्ह्याला मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा… यवतमाळ : हातावर गोंदलेल्या नावामुळे खुनाचा उलगडा…
महाविकास आघाडी सरकारमध्ये शेजारच्या अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. पालकमंत्री म्हणून बच्चू कडू अकोला जिल्ह्यात चांगलेच सक्रिय झाले होते. दर आठवड्यात त्यांचा जिल्ह्यात दौरा राहत असल्याने प्रशासनावर वचक होती. मात्र, राज्यात राजकीय भूकंप घडून आल्यानंतर सत्तापरिवर्तन झाले. नव्या युती सरकारमध्ये जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची आशा फोल ठरली. जिल्ह्यात भाजपचे विधानसभेवर चार, तर परिषदेवर एक आमदार आहेत. त्यामुळे भाजपच्या कोट्यातून जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची मोठी अपेक्षा होती. आमदार रणधीर सावरकर यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत होते.
हेही वाचा… नागपूर : पतीने पत्नीच्या डोक्यात घातली कुऱ्हाड; पाणी भरण्यास सांगितल्याचा राग
भाजपने त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. मंत्रिपदाची संधी जिल्ह्याला मिळू शकली नाही. शिंदे गट किंवा राष्ट्रवादीचा अजित पवार गटाच्या माध्यमातून जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची दुरान्वये शक्यता नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील तब्बल सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतली आहे. त्यामध्ये त्यांचा गृहजिल्हा नागपूरचा देखील समावेश आहे. इतर जिल्ह्यांपेक्षा नागपूरकडेच त्यांचे अधिक लक्ष असल्याचे दिसून येते. अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यापासून केवळ एका जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आले होते. खरीप हंगाम आढावा बैठक देखील त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली. शहरात दंगल उसळली, पारस येथे मोठी दुर्घटना घडली; परंतु त्याच्या पाहणीला देखील देवेंद्र फडणवीस आले नाहीत.
हेही वाचा… कांदा यंदाही करणार वांदा!; कोणाला रडवणार अन सरकारी धोरण काय जाणून घ्या…
किमान स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला तरी ते अकोला जिल्ह्यात उपस्थित राहतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आपला गृहजिल्हा नागपूरलाच पसंती दिली. त्यामुळे अकोलेकरांची निराशा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याला वेळ देतील का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
‘झेंडा’ मंत्रीही नाहीच
अकोला जिल्ह्याला अपवाद वगळता आतापर्यंत बाहेरचेच पालकमंत्री मिळाले आहेत. इतर जिल्ह्यातील पालकमंत्री राहिल्यावर त्यांचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होतेच, याचा अनुभव अकोलेकरांनी अनेकवेळा घेतला. बाहेरचे पालकमंत्री असले तरी ते किमान स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाला ध्वजारोहणाला उपस्थित राहत होते. त्यामुळे त्या पालकमंत्र्यांना ‘झेंडा’ मंत्री म्हणून गंमतीने संबोधले जात असे. मात्र, आता ध्वजारोहणाला देखील पालकमंत्री उपस्थित राहत नसल्याचे चित्र आहे.