नागपूर : नागपूरसह पूर्व आणि पश्चिम विदर्भात अनेक उद्योग आणण्यात सरकार यशस्वी झाले आहे. नागपूरचा प्रकल्प गुजरातला जाणार आहे, अशी माहिती कुठल्या सूत्रांनी त्यांना दिली. त्याबद्दल उद्योगमंत्री म्हणून कुठेही नोंद नाही. मात्र विदर्भात किती उद्योग आले याबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती घेऊन बोलावे, अशी टीका उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उदय सामंत नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. विदर्भातील कुठलाही उद्योग अन्य राज्यात जाण्याचा प्रश्नच नाही. गुजरातला कुठला प्रकल्प जाणार याबाबत प्रधान सचिव यांच्याकडून माहिती घेण्यासाठी सूचना दिल्या आहे. विदर्भात किती उद्योग आले याबद्दल कदाचित विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचे लक्ष नसावे, अशी टीका त्यांनी केली.

हेही वाचा – आमिर खान २१ सप्टेंबरला अकोल्यात, शेतकऱ्यांशी संवाद साधणार

महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू असे विरोधक म्हणत होते. देशातील पहिल्या सेमीकंडक्टर उद्योगाचे उद्घाटन मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाले. फेक नरेटिव्ह सेट करण्यासाठी विरोधकांकडून फेक बातम्या प्रकाशित केल्या जात असल्याचे सामंत म्हणाले. परकीय गुंतवणुकीमध्ये मागील काळात मागे असलेला महाराष्ट्र सगळ्यांना मागे टाकून आता पुढे चाललेला आहे. महाराष्ट्र एफडीआयमध्ये क्रमांक एकवर आहे आणि राहणार असल्याचे सामंत म्हणाले.

महायुती असो की महाविकास आघाडी असो, बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांनी संयम ठेवला पाहिजे. महायुती म्हणून निवडणुकीला समोर जाताना आपली मते कमी होणार नाही याची प्रत्येक पक्षाच्या घटक पक्षाच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे, असेही सामंत म्हणाले. महायुतीमध्ये सन्मानजनक जागा वाटप होईल आणि त्याबाबत चर्चा सुरू आहे. तिसरी आघाडी निर्माण झाली तरी महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे, दोन महिन्यांनंतर मी जेव्हा नागपूरला येईल तेव्हा महायुतीचे सरकार सत्तेत आले असेल. सगळ्यांना स्वतंत्र निर्णय घेऊन आघाडी करण्याचे अधिकार असल्याचे सामंत म्हणाले.

हेही वाचा – बुलढाणा जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात शस्त्र तस्करी उघड

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून समोर केले जात असले तरी ते काही चेहरा नाही, असे संकेत शरद पवार यांनी दिले आहे. यावेळी त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदासाठी नवा चेहरासुद्धा असू शकतो. त्यामुळे त्यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांना सांगितले की, मुख्यमंत्रीपद डोळ्यासमोर ठेवून पक्षाचे काम करू नका, संख्याबळ आणण्यासाठी काम करा, असे शरद पवार म्हणाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीचा चेहरा होऊ शकत नाही, असेही सामंत म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which sources told vijay wadettiwar that nagpur project will go to gujarat industry minister uday samant question vmb 67 ssb