नागपूर: रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर धावत्या गाडीमध्ये चढत असताना अचानक तोल गेल्याने एक युवक खाली पडला. गाडी आणि फलाटमध्ये अडकला. मात्र, त्याचवेळी गाडीमधील कर्तव्य संपवून परतणाऱ्या ‘आरपीएफ’च्या जवानाने इतरांसह तात्काळ त्या व्यक्तीला बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला.
यशवंतपूरहून निजामुद्दीनला जाणारी गाडी क्रमांक १२६४९ मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर पोहोचली. हिमाचल प्रदेशातील भोटा गावात राहणारे सुनील कुमार यशवंतपूरम येथून या गाडीमधून प्रवास करत होते.
हेही वाचा… परिवहन खात्यातील भ्रष्टाचार; मोटार वाहन निरीक्षकांच्या बदल्या आता संगणकीय प्रणालीद्वारे
खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी ते नागपूर स्थानकावर उतरले. त्याचवेळी त्याला गाडी पुढे निघाल्याची दिसली. सुनील कुमारने धावत्या गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांचा तोल गेला आणि ते गाडीमधून खाली पडले. फलाट आणि गाडीच्या फटीमध्ये अडकले.
दरम्यान, याच गाडीने कर्तव्य संपवून घरी परतणाऱ्या रवींद्र कुमार या ‘आरपीएफ’ जवानाला सुनील कुमार पडताना दिसले. त्यांनी तिकडे धाव घेतली, तसेच फलाटावरील लोकही धावले आणि सुनीलकुमारला सुरक्षित बाहेर काढले.