नागपूर : रेल्वे क्रॉसिंगवरून रूळ ओलांडत असताना अचानक मालगाडी धडधडत आली व चारचाकीवर आदळली. वाहनचालक थोडक्यात बचावला.
रविवारी रात्री मालगाडी जाणार असल्याने गेटमॅनने बोखारा गोधनी रेल्वे गेट बंद केले. त्यामुळे गेटच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या. मालगाडी पुढे गेल्यानंतर गेट मॅनने फाटक उघडले फाटक उघडताच दोन्ही बाजूला प्रतीक्षेत असलेली वाहने रुळ ओलांडू लागली. दरम्यान पुढे निघून गेलेली मालगाडी मागे येऊ लागली. त्यामुळे रेल्वे क्रासिंगवरून वाहने काढणाऱ्या वाहन चालकांमध्ये गोंधळ उडाला. आरडाओरड सुरू झाली. मालगाडी नजिक आली. तेव्हा अमोल घरमारे यांची कार रुळावर होती. वाहनांची गर्दी असल्याने अमोलला हलता आले नाही. जीव वाचविण्यासाठी त्याने बाहेर उडी घेतली. मालगाडीची धडक त्याच्या कारला बसली. कारच्या समोरील भाग संपूर्ण तुटला.
हेही वाचा – ऐन उन्हाळ्यात विदर्भाचे ‘काश्मीर’ दाट धुक्यात हरवले…
या घटनेत मोटारसायकल चालक जखमी झाला. या प्रकरणी फिर्यादी अमोल घरमारे (३५), रा. हुडकेश्वर यांच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी मालगाडीचे चालक (लोकोपायलट) आणि गेट मॅन विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान मोटारसायकल चालक अक्षय कोठे (३०), रा. झिंगाबाई टाकळी हा जखमी झाला. तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.