अकोला : ऑनलाइन व्यवहार करतांना आता ‘डिजिटल अरेस्ट’ नव्या ‘सायबर फ्रॉड’चा धोका निर्माण झाला आहे. अधिकारी असल्याचे बतावणी करून सायबर गुन्हेगार फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन अकोला पोलिसांनी केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आधुनिक युगात इंटरनेट जीवनाचा अविभाज्य घटक झाला. आर्थिकसह अनेक व्यवहार आता ऑनलाइन स्वरूपात होत आहेत. अपुऱ्या माहितीमुळे ऑनलाइन व्यवहार करतांना फसवणूक होण्याची शक्यता असते. सायबर गुन्हेगार याच उणीवांचा फायदा घेऊन आर्थिक व सामाजिक नुकसान करतात. सद्यस्थितीत सायबर गुन्ह्यांमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ च्या नावाने नागरिकांची फसवणूक सुरू आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ हा ‘सायबर फ्रॉड’चा नवा प्रकार आहे. यात सायबर गुन्हेगार पोलीस, सीबीआय, ईडी, कस्टम, आयकर, अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करीत भ्रमणध्वनीवरून संपर्क साधतात. अनैतिक कामात सहभागी असल्याचा आरोप ते करतात. त्यानंतर फ्रॉड करणारे ‘व्हिडीओ कॉल’ करण्याची मागणी करतात. कारवाई करून अटक करण्याची भीती दाखवली जाते. बनावट कागदपत्रे किंवा खोटे ओळखपत्र दाखवून अटकेची भीती दाखवली जाते. कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्यासाठी दबाव देखील टाकला जातो. सायबर गुन्हेगारांचा ऑनलाइन पद्धतीने पैसे लुबाडण्याचा हेतू असतो. त्यासाठी घाबरवले जाते आणि तणावाखाली आणले जाते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

हेही वाचा…‘लाडकी बहीण योजने’च्या वैधतेबाबत राज्य शासन गप्प, उच्च न्यायालयाकडून आता…

या प्रकारचे कॉल येताच, तेव्हा शांत रहावे. कॉल करणाऱ्याला तुमची ओळख देऊ नका. त्यांच्या मागणीनुसार कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करू नका. कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रांना याबद्दल सांगून जागृत करा. अनोळखी लिंक्सवर क्लिक करणे टाळा तसेच त्यांचे सांगणेप्रमाणे कोणत्याही प्रकारचे ॲप्लीकेशन किंवा फाइल इंस्टॉल करू नका. कोणतेही पोलीस तुमच्याकडून कधीही फोनवर पैसे मागणार नाहीत. असा फोन आल्यास प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात येण्याचा आग्रह धरावा. कोणत्याही प्रकारच्या धमकीला बळी पडू नका. अशा घटनांमध्ये ‘स्काईप ॲप’ डाउनलोड करायला सांगितले जाते, ते अजिबात करू नका. कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या व्हिडिओ कॉलला प्रतिसाद देवू नका, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा…चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीचा मार्ग मोकळा; न्यायालयाची राजकीय हस्तक्षेपाला चपराक

…तर तो सायबर गुन्हेगाराचा कॉल

अचानक अनोळखी क्रमांकावरून संपर्क साधून पोलीस, ईडी किंवा सीबीआय अधिकारी असल्याचे सांगत गुन्ह्यात गुंतले असल्याचा आरोप केल्यास तो सायबर गुन्हेगाराचा कॉल असल्याचे लक्षात घ्यावे, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही कायदेशीर व्यवस्था नाही. ही केवळ फसवणूक आहे. अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडू नये. फसवणूक झाल्यास तात्काळ सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवावी. शंकर शेळके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While doing online transactions now threat of digital arrest new cyber fraud arisen ppd 88 sud 02