वाशीम : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी ग्रामपंचायत हनवतखेडाचे ग्रामसेवक म्हणून देशमुख यांची नियुक्ती केली होती. मात्र, मालेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी वरिष्ठांचा आदेश डावलून भुजाडे यांच्याकडे ग्रामसेवक पदाचा पदभार देऊन वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
ग्रामीण भागाचे ‘मिनी मंत्रालय’ म्हणून जिल्हा परिषद ओळखली जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत या धडाकेबाज निर्णय क्षमता असलेल्या अधिकारी म्हणून परिचित आहेत. मात्र, त्यांचा आदेश धुडकावून मनमर्जीने वागणारे गटविकास अधिकारी स्वतःला मोठे समजत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
हेही वाचा – ‘मुलांनो, जंकफूड नको तृणधान्य खा आणि शक्तिमान बना’; मिलेट मिशनचा सूर
मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत हनवतखेडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पंत यांनी लेखी आदेश काढून देशमुख यांची नियुक्ती केली होती. मात्र, मालेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी वरिष्ठांचा आदेश धुडकावून आपल्या मनमानी पद्धतीने ग्रामसेवक भुरकाडे यांना रुजू केले. याबाबत ग्राम पंचायतचे उप सरपंच प्रदीप भगत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार दिली असून देशमुख यांनाच ग्रामसेवक म्हणून नियुक्त करण्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांना विचारणा केली असता, याबाबत माहिती घेते, असे सांगितले.