नागपूर : ‘ब्लॅक लेपर्ड’ म्हणजेच काळ्या बिबट्यांची संख्या अलीकडच्या काही वर्षात वाढली आहे. पांढऱ्या बिबट्याची नोंद मात्र अजूनतरी राज्यात झालेली नव्हती. बुधवारी कोकणातील रत्नागिरी येथे बिबट्याचा पांढरा बछडा आढळून आल्याने सगळीकडेच चर्चा झाली. या बछड्याने अद्याप डोळेही उघडलेले नव्हते, पण मादी बिबट त्यांना घेऊन गेली.महाराष्ट्रातील कोकणात पहिल्यांदाच या बिबट्याचा पांढऱ्या रंगाचा बछडा आढळला आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील एका गावात काजू लागवडीसाठी झाडे तोडण्याचे काम सुरू होते. झाडे तोडत असताना मजूरांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. त्यातील एक बछडा सामान्य होता, तर दूसरा बछडा मात्र पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा होता. हे दोन्ही बछडे नुकतेच जन्मलेले असावेत कारण त्यांनी डोळे देखील उघडलेले नव्हते.

ऊस तोडणी कामगारांना ते आश्चर्य वाटल्याने त्यांनी या बछड्याची छायाचित्र घेण्यास सुरुवात केली. मात्र, जवळच असलेल्या मादी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि ते कामगार तेथून दूर पळाले. रत्नागिरी वनखात्याला ही माहिती मिळाली. वनखात्याची चमू दाखल होईस्तोवर मादी बिबट्याने तिच्या दोन्ही बछड्यांसह मुक्काम हलवला होता.

दरम्यान,या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. बिहार आणि मध्यप्रदेश या राज्यात यापूर्वी १९६ आणि १९६५ साली पांढऱ्या रंगाचे बिबट आढळल्याची नोंद आहे. महाराष्ट्रात मात्र पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाचा बिबट आढळला आहे. महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प, पेंच व्याघ्रप्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात काळ्या बिबट्याच्या नोंदी आहेत. किंबहूना काळ्या बिबट्याची संख्याही याठिकाणी वाढली आहे.शरीरातील रंगद्रव्यात बदल झाल्यास बछडा पांढरा, काळा, राखाडी होतो. अलीकडेच दोन ते तीन वर्षांपूर्वी बोर व्याघ्रप्रकल्पात तपकिरी रंगाचे अस्वलाचे दोन बछडे आढळले होते. तर अलीकडेच काही दिवसांपूर्वी आणखी एक तपकिरी रंगाचा बछडा आढळला. तर नागपूर येथेही गोरेवाड्यात ‘अल्बिनो ब्लॅकबक’ म्हणजेच पांढरे काळवीट आहे.

शरीरात ‘मेलेनिन’ रंगद्रव्याचे प्रमाण वाढले तर बछडा काळा जन्माला येतो. ते कमी झाले असेल तर ‘ल्युकिझम’ म्हणजेच पांढरे होता. ‘ल्युसिस्टिक’ प्रकारात शरीर काळे किंवा पांढरे असले तरी डोळे नियमित रंगाचे असतात. ‘अल्बिनो’ प्रकारात डोळे लालसर दिसतात. रत्नागिरीतल्या या बछड्याने अद्याप डोळे उघडले नाही. त्यामुळे ते ‘ल्युसिस्टिक’ की ‘अल्बिनो’ हे कळू शकले नाही.