नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिलला देशभरात साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस भारतात उत्साहाने साजरा केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाद्वारे भावी पिढीपर्यंत त्यांचे विचार पोहोचावे यासाठी त्यांच्या विचारांचा-योगदानाचा प्रसार आणि प्रचार केला जातो. आंबेडकर जयंतीचा इतिहास, पहिली जयंती कुणी साजरी केली आणि महत्त्व जाणून घेऊया…

माहितीनुसार आंबेडकर जयंती पहिल्यांदा १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यामध्ये साजरी करण्यात आली होती. यासाठी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन सदाशिव रणपिसे यांनी पुढाकार घेतला होता. तेव्हापासून दरवर्षी आंबेडकर जयंती साजरी केली जात आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील कित्येक देशांमध्ये स्थायिक असलेले भारतीय नागरिकही आंबेडकर जयंती साजरी करतात.

आंबेडकर जयंती साजरी करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे समाजात समता, बंधुता आणि न्यायाच्या विचारांचा प्रसार करणे आहे. डॉ. आंबेडकर यांनी संविधानाच्या निर्मितीत जे योगदान दिलंय, ते भारताला एक आधुनिक, लोकशाहीवादी  आणि समतावादी राष्ट्र बनवण्यासाठीचा पाया होता. त्यांनी महिला, मागासवर्गीय आणि दलित समुदायाच्या सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलली. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ त्यांचा हा संदेश आजही लोकांना प्रेरणा देतो.

पुण्यातून सुरुवात

 बाबासाहेब यांचा पहिला वाढदिवस पुण्यात प्रथम १४ एप्रिल १९२८ रोजी रणपिसे यांनी साजरा केला. इतकेच नव्हे तर या जन्मदिवस समारंभाचे ते जणू शिल्पकारच ठरले. बाबासाहेबांच्या जयंतीची प्रथा त्यांनीच सुरू केली. खडकी पत्र विभाग दलित मंडळाचे अध्यक्ष असताना जयंतीचे औचित्य साधत त्यांनी बाबासाहेबांची प्रतिमा हत्तीच्या अंबारीत ठेवून प्रभात फिल्म कंपनीच्या रथातून, उंटावरून प्रचंड मिरवणुका काढल्या होत्या. यानंतर खडकी भागात प्रत्येक वस्तीत आंबेडकरांची जयंती साजरी व्हायला लागली. या सर्व वस्त्यांचे भाऊसाहेबांनी एकीकरण घडवून दलित मंडळाची स्थापना केली, या मंडळातर्फे आंबेडकरांची जयंती भव्य प्रमाणात साजरी केली. २४ ऑगस्ट १९५८ रोजी रणपिसे यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळीने पुणे शहरात त्यांचा सत्कार समारंभ घडवून आणला होता. बाबासाहेबांची पहिली जयंती साजरी करत या उपक्रमाची सुरुवात करणाऱ्या भाऊसाहेबांनी विद्यार्थ्यांसोबतच अस्पृश्यवर्गाची जी बहुमोल सेवा केली त्याबद्दल संपूर्ण आंबेडकरी समाज त्यांचा सदैव ऋणी राहील यात शंका नाही.