लोकसत्ता टीम
नागपूर : हवामानाचा अंदाज सांगणाऱ्यांचे सध्या पेव फुटले आहे. काही संकेतस्थळे तसेच व्यक्ती प्रमाणित किंवा प्रशिक्षित नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून दिला जाणारा अंदाज गोंधळात भर टाकणारा ठरत आहे. त्याचा विपरित परिणाम प्रामुख्याने शेतकऱ्यांवर होत आहे. जागतिक हवामानशास्त्रीय विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये, तापमान कसे मोजायचे, कोणती साधणे वापरायची अशा सर्व सूचनांचा समावेश आहे.
मात्र, गेल्या काही वर्षात प्रमाणित नसणारे लोक हवामानाचा अंदाज द्यायला लागले आहेत. अशा संकेतस्थळांची संख्याही वाढत आहे. शेतकरी आणि हवामानाच्या अंदाजांवर ज्यांचा व्यवसाय अवलंबून आहे, अशा लोकांसाठी हे अंदाज त्रासदायक ठरत आहेत. काही लोक आवड म्हणून तर काही लोक मुद्दाम भीतीदायक किंवा खूप चूकीचे आणि आकर्षक शीर्षकाचे हवामान अंदाज देतात. पुढे ते समाजमाध्यमावर येतात. यामुळे मिळणारे ‘हीट्स आणि लाईक्स’मधून त्यांना पैसा मिळतो. हवामान अंदाज सांगणारी अनेक संकेतस्थळे आहेत, ज्याठिकाणी नि:शुल्क तपशील मिळतो.
आणखी वाचा-वर्धा : भाजप उमेदवाराची तक्रार अन् शिक्षक नेता तडकाफडकी निलंबित
हा तपशील आणि अर्धवट ज्ञानाचा उपयोग करुन ही मंडळी ‘एक्स’सारख्या समाजमाध्यमावर हवामानाचा अंदाज प्रसारित करतात. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. आता या क्षेत्रात बँक कर्मचारी, वकील, शेतकरी एवढेच नाही तर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी देखील उतरले आहेत. त्यामुळे या खासगी हवामान संकेतस्थळावर आणि वैयक्तिकरित्या हवामानाचा अंदाज देणाऱ्यांवर कारवाईचा बडगा कोण उगारणार, हा प्रश्न कायम आहे.
सरकार नियंत्रण आणू शकते
खासगी हवामानाचा अंदाज योग्य नाही. अचूक अंदाजासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे. ‘क्लाऊड’ हा एक घटक शिकायला सहा सहा महिने लागतात. खासगी संकेतस्थळे, काही व्यक्ती भारतीय हवामान खात्याचाच डेटा वापरुन अंदाज देतात. त्यावर आम्ही नियंत्रण आणू शकत नाही, पण सरकार निश्चितच त्यावर नियंत्रण आणू शकते, असे नागपूर येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी सांगितले.
आणखी वाचा-सहायक पोलीस निरीक्षकांसाठी आनंदाची बातमी…. पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम…..
मूलभूत आणि सखोल ज्ञान आवश्यक
हवामानाचे अंदाज देणे ही एक जटील प्रक्रिया आहे. यात मूलभूत आणि खोलवर ज्ञान हवे. थोडीही चूक झाली तर अंदाज चुकतो आणि त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. म्हणूनच योग्य आणि प्रमाणित प्रशिक्षण आवश्यक आहे, असे मत इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ रिडिंगच्या नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक सायन्स अँड डिपार्टमेंट ऑफ मेट्रॉलॉजी विभागातील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी व्यक्त केले.