नागपूर : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या नागपुरातील मुख्यालयावर भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे वामन मेश्राम हे नाव देशभरात चर्चेत आले. कोण आहेत हे वामन मेश्राम ? त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता आहे.
हेही वाचा : पहिली बाजू : पूर्वग्रह संघाचे की टीकाकारांचे?
मूळचे विदर्भातील (यवतमाळ जिल्हा) असलेले वामन मेश्राम यांनीऔरंगाबाद येथे शिक्षण घेत असताना १९७० मध्ये सामाजिक क्षेत्रात काम सुरू केले. बसपा संस्थापक. कांशीराम यांनी स्थापन केलेल्या बामसेफ या कर्मचारी कर्मचारी संघटनेत त्यांनी १९७५ मध्ये प्रवेश केला. तेथून ख-या अर्थाने त्यांचा सामाजिक चळवळीतील प्रवास सुरू झाला. संघटना बांधणीसाठी त्यांनी परिश्रम घेतले. त्यामुळेच संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष डी.के. खापर्डे यांच्यानंतर बामसेफच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी वामन मेश्राम यांच्याकडे सोपविण्यात आली.
हेही वाचा : नागपूर महापलिकेत फोन करताच ऐकायला मिळणार ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’
त्यांनी २३ पेक्षा अधिक संघटना स्थापन केल्या असून ते नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी शिबीर आयोजित करतात. त्यांनी पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली. देशभरात विविध परिषदा, संमेलन आयोजित करून दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक समाजाला जागरूक करण्याचे काम ते करतात. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेनुसार कर्मचा-यांच्या हक्कांसाठी लढा देतात. त्यांनी हरियाणा येथे डीएनए परिषद आयोजित केली होती. परंतु तेथील सरकारने ती होऊ दिली नाही. त्यासाठी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीला जबाबदार धरतात.
संघ हा संविधान विरोधी असल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात त्यांनी नागपुरात संघ मुख्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा दिला होता. परंतु न्यायालयाने परवानगी नाकारली. मात्र, त्यानंतरही उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर आले होते. या घटनेमुळे वामन मेश्राम अचानक प्रकाशझोतात आले.
मेश्राम यांच्यामुळेच व्हीव्हीपॅट
मतदान यंत्रात (ईव्हीएम)गैरप्रकार होऊ शकतो. हे लोकशाहीसाठी घातक आहे. यासाठी त्यांनी न्यायालयीन लढा दिला. त्यानंतर न्यायालायने ईव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट वापरण्याचे निर्देश दिले होते.