कविता नागापुरे
भंडारा : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने रविवारी विदर्भ स्तरीय दहीहांडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी लाखोंची बक्षिसे सुध्दा जाहीर करण्यात आली होती. मात्र, दहीहांडी फोडणाऱ्या लाख मोलाच्या गोविंदांच्या सुरक्षिततेसाठी न्यायालयाने सुचवलेल्या उपाययोजनांना आणि घालून दिलेल्या नियमांना आयोजकानी गंभीरपणे घेतले नसल्याचे रविवारच्या दहीहंडी उत्सवात दिसून आले. यात एकन गोविंदाून फ्रॅक्चर तर अनेक गोविंदा जखमी झालेले असताना अद्याप पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने नागरिकांनी प्रसार माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.
आ. भोंडेकर यांनी आयोजित केलेल्या या दहीहंडी स्पर्धेत जिल्ह्यातील ५ तर जिल्ह्याबाहेरील २ गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता. यात २ महिलांचे पथकही होते. रविवारी सायंकाळी उशिरा दसरा मैदान येथे डिजेच्या तालावर आणि ढोलाच्या गजरात गोविंदा पथकांनी दहीहंड्या फोडण्यास सुरुवात झाली. रात्री ७.३० वाजतापर्यंत कोणीही ४० ते ५० फुटाच्या दहीहंडी पर्यंत न पोहचू शकल्याने दोरखंड थोडा खाली घेण्यात आला. त्यानंतर भोजपुर येथील आदिशक्ती गोविंदा पथकांने दहीहंडी फोडून पहिला क्रमांक पटकावला तर भोजपुरच्याच दुसऱ्या एका पथकाने द्वितीय स्थान मिळवला. दहीहंडी फोडून झाल्यानंतर या दोन्ही विजयी पथकांच्या गोविंदांनी एकत्र येत पुन्हा दहीहंडीच्या दोरखंडापर्यंत पोहचण्यासाठी थरावर थर लावले आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणी या उत्साहावर पाणी फिरले गेले. दहीहंडी बांधण्यासाठी लावण्यात आलेला एक लाकडी स्तंभ कोसळून पडला. यात एक गोविंदाच्या पायाला फ्रॅक्चर तर अनेक गोविंदा जखमी झाले. या सर्व जखमी गोविंदांना आ. भोंडेकर यांच्या पेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अभिषेक हसराज देशमुख यांच्या पायाला फ्रॅक्चर असून प्रजत बांगरे, यशवंत हलमारे, हेमंत मडावी, शिवम परतेकी, गुरू सिरसाम, आयुष झंझाड, रोहित हलमारे, अभय देशमुख, बबलू मडावी, आयुष वैद्य अशी जखमींचा नावे आहेत.
हेही वाचा >>>धावत्या रेल्वेगाडीत प्रसूतीकळा, अखेर स्थानकावर बाळाचा जन्म
यासंदर्भात नगर पालिकेचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांना विचारणा केली असता न.प. धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनी सुध्दा आम्ही फक्त मंचाची परवानगी आणि ते ही मंत्री महोदय येणार म्हणून दिली असल्याचे स्पष्ट केले. तहसीलदार लांजेवार सुध्दा उत्तर देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला नेमकी परवानगी दिली कोणी? आयोजकांनी सर्व संबंधित विभागांकडून कार्यक्रमासाठी परवानगी घेतली का? उद्योगमंत्री उदय सामंत या कार्यक्रमात हजर असताना प्रशासनाच्या वतीने सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणते नियोजन करण्यात आले होते? जे गोविंदा जखमी झाले त्यांना मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे शासकीय नोकरीत सामावून घेतले जाणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक त्यांच्या फौजफाट्यासह उपस्थित असताना सुध्दा ध्वनिक्षेपकांच्या आवाजाची मर्यादा पाळली गेली नाही. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.
हेही वाचा >>>समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्तांना येथे मिळणार नि:शुल्क उपचार; जाणून घ्या योजनेबद्दल
अद्याप गुन्हा दाखल नाही
एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना केवळ घटनेचा पंचनामा करण्यात आला असल्याचे सांगून अद्याप जखमींपैकी कुणी तक्रार केलेली नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याचे पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी सांगितले. मात्र पोलीस अधीक्षकच कुणालातरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत, अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.