लोकसत्ता टीम
नागपूर : रामटेक वनपरिक्षेत्रातून जेरबंद केलेल्या वाघाचा मृत्यू झाल्याने वनखात्याच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खात्यानेच त्या वाघाने २०-२२ जनावरे मारल्याचे नमूद केले होते आणि आता दहा दिवसानंतर दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात खाते त्या वाघाने ४० पेक्षा जास्त जनावरे मारल्याचे सांगत आहेत. तर ज्या गावातील जनावरे वाघाने मारली, ते गावकरी २० ते २ जनावरेच मारली असून खात्याने त्याची नुकसानभरपाई दिल्याचे सांगत आहे.
रामटेक-पारशिवणी परिसरात या वाघाने पाळीव जनावरांची शिकार करण्यास सुरुवात केली होती. मात्र, हा वाघ आईपासून नुकताच वेगळा झाला होता आणि तो स्वतःचा अधिवास शोधत होता. त्याने गावात मुक्काम ठोकला नव्हता तर तो जंगल आणि गावाच्या सीमेवर फिरत होता. गावातील जनावर मारल्यानंतर खात्याकडे तक्रार आली की खात्याचे कर्मचारी त्याच्या मागे जात. त्याने केलेली शिकार ते काढून घेत आणि त्यामुळे तो वाघ पुन्हा नवीन जनावराची शिकार करत होता. वाघ आपली शिकार किमान तीन दिवस पुरवून खातो, हे खात्याला ठाऊक नव्हते का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्या वाघाला त्याची शिकार खाऊ दिली असती, तर कदाचित त्याने वारंवार जनावरे मारली नसती, असे या क्षेत्रातील अभ्यासकांचे म्हणणे आहे. खात्याचे म्हणणे एकदा मान्यही केले, तरी मग त्या वाघाला हत्तीच्या साहाय्याने जंगलाच्या आत वळवता आले असते.
आणखी वाचा-नागपुरात तृतीयपंथीयांकडून सर्वसामान्यांची लूट! मुलगा जन्मल्यास सोन्याची साखळी…
वनखात्याने काही दिवसांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्च करून पेंच व्याघ्रप्रकल्पात हत्ती आणले आहेत आणि आणखी आणले जाणार आहेत. मध्यप्रदेश वनखाते हे करू शकते, तर महाराष्ट्र का वनखाते का नाही? महाराष्ट्र वनखात्यात मानव- वन्यजीव संघर्षावर उपाय शोधण्याऐवजी आर्थिक मोबदला देऊन गावकऱ्यांना शांत करणे, नाही तर वाघ जेरबंद करणे एवढेच केले जाते. मात्र, त्या वाघालाही जगण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या भरवश्यावर पर्यटनातून कोट्यवधी रुपये खात्याच्या तिजोरीत जमा होतात, हे खाते विसरले आहे. या वाघाने एकही माणूस मारला नव्हता किंवा माणसांवर हल्ला केला नव्हता. तरीही भविष्यात माणसांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले, पण गोरेवाडा बचाव केंद्रात आणल्यानंतर तासाभरातच त्याचा मृत्यू झाला. गावकरीच आता त्या वाघाला बेशुद्ध करण्यासाठी दोनदा “डार्ट” मारल्याचे सांगत आहेत. त्यामुळे येथेही त्याच्या जेरबंद करण्याच्या प्रक्रियेवर शंका निर्माण होत आहे.
वाघाला जेरबंद केल्यानंतर गोरेवाडा बचाव केंद्रात आणले. पिंजरा उपलब्ध नसल्याने तब्बल तासभर हा वाघ बचाव केंद्राच्या कॉरिडॉरमध्येच होता. याच परिसरात दोन वाघ होते आणि त्या वाघांचा आवाज माणसांनाही घाबरवणारा होता. त्यामुळे जेरबंद करून आणलेला वाघही दचकला आणि त्यातच हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनादरम्यान वाघाच्या हृदयाच्या चारपैकी तीन कप्प्यात रक्तच नव्हते. त्याच्या हृदयावर चरबीचा थर जमा झाल्यामुळे हृदयाची उघडझापदेखील बरोबर होत नव्हती. रक्त फुफ्फुसामध्येच थांबत होते, असे पशुवैद्याक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी अवयवाचे नमुने न्यायवैद्याक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
आणखी वाचा-काँग्रेस आमदार विकास ठाकरेंचे आरोपसत्र, रोख कोणाकडे?
त्याला जेरबंद करणे आवश्यक
वाघांमुळे लोकांचा जीव धोक्यात येत असेल, तर त्या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या नियमावलीतच नमूद आहे. या वाघाने माणसांवर हल्ला केला नसला तरीही शेतातील गोठ्यांमध्ये जाऊन जनावरे मारली. त्याचा मुक्काम जास्तीत जास्त शेतातच असल्याने गावकऱ्यांना शेतात काम करणे कठीण झाले होते. त्यामुळे त्याला जेरबंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला. -श्रीलक्ष्मी ए.,वनसंरक्षक (प्रादेशिक)
वाघ जेरबंद करणे हा पर्याय नाही
मध्यप्रदेश वनखात्याप्रमाणे हत्तीचा वापर करून वाघाला जंगलाच्या आत पाठवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. आता तर पेंच व्याघ्रप्रकल्पात हत्ती देखील आणले आहेत. मात्र, मानव-वन्यजीव संघर्ष झाला म्हणून वाघ जेरबंद करणे हा पर्याय नाही. यामुळे संघर्ष थांबणार नाही. -डॉ. जेरील बानाईत, वन्यजीव अभ्यासक