लोकसत्ता टीम
नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे, येथून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दोन वेळा दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. २०२४ मध्येही पक्षाने त्यांना उमेदवारी दिली आहे. गडकरींना‘ विकास पुरूष’ म्हणून ओळखले जाते. नागपूरचा चेहरा-मोहरा त्यांनी बदलला, त्यांच्या विरोधात काँग्रेसला उमेदवार मिळत नाही, अशी टीका भाजपकडून केली जाते. असे असले तरी गडकरी सुद्धा एका निवडणुकीत पराभूत झाले होते हा इतिहास आता काँग्रेसकडून पुढे केला जात आहे. कोणती होती ही निवडणूक हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
पूर्वी नागपूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता व येथून लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीत याच पक्षाचा झेंडा फडकत असे. भारतीय जनता पक्षासाठी तो काळ संघर्षाचा होता. याच काळात म्हणजे १९८५ मध्ये विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या. नागपूरमधील सर्व म्हणजे पाचही विधानसभा मतदारसंघ हे काँग्रेसचेच बालेकिल्ले होते. यापैकी पश्चिम नागपूर हा एक मतदारसंघ, हा सुद्धा काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी तेथे भाजपकची संघटनात्मक बांधणी चागंली होती. येथून भाजपने नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली तर काँग्रेसकडून माजी खासदार गेव्ह आवारी रिंगणात होते या निवडणुकीत काँग्रेसच्या आवारी यांना ४९ हजार ६०७ मते मिळाली होती तर गडकरी यांना २८ हजार ५५ मते मिळाली होती. गडकरी यांचा २१ हजार ५५२ मतांनी पराभव झाला होता. एकूण ९७ हजार २९४ वैध मतांपैकी आवारी यांना ५०.९९ टक्के तर गडकरी यांना २८.८४ टक्के मते मिळाली होती. निवडणुकीच्या राजकारणात गडकरीं यांनाही पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतरच्या काळात गडकरी यांचा राजकारणातील आलेख उंचावत गेला. ते पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले.
आणखी वाचा- पेपरफुटी, परीक्षेतील गैरप्रकारांवर कायदा! निंबाळकर समितीकडून अहवाल सादर
मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी त्यांना राज्यातच नव्हे तर देशात नाव मिळवून देणारी ठरली, विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्यानंतर नागपूरमधून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले व दहा वर्षांपासून केंद्रात रस्ते बांधणी खात्याचे मंत्रीपद भूषवित आहे. आता त्यांच्या दिग्गज नेत्यांमध्ये समावेश होतो. असे असले तरी निवडणुकांमध्ये मतदार हाच राजा असतो, त्यामुळेच भाजप जेव्हा नागपूर हा त्यांचा बालेकिल्ला आहे, असा दावा करतो व विरोधकांकडे गडकरींविरोधात उमेदवार नाही, अशी टीका करतो त्यावेळी काँग्रेस नेते १९८५ च्या विधानसभा निवडणुकीची आठवण त्यांना करून देते. काँग्रेस नेते, शहर काँग्रेसचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नागपुरातील संभाव्य उमेदवार आमदार विकास ठाकरे म्हणाले, नागपूरमधून काँग्रेसने आतापर्यंत लोकसभेच्या अनेक निवडणुका जिंकल्या, भाजपला तीनच निवडणुकांमध्ये यश आले. २०१९ ते २०२४ या दरम्यान झालेल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणुका काँग्रेसनेच जिंकल्या. निव़़डणुकीत जय-पराजय होतच असतो. १९८५ मध्ये गडकरीही पराभूत झाले होते.