वर्धा : थ्री इडियट हा कमालीचा लोकप्रिय ठरलेला चित्रपट. नवनवे कीर्तिमान स्थापन करणाऱ्या या चित्रपटातील ‘रँचो’ म्हणजे फुंगसूक वांगडूची मध्यवर्ती भूमिका खूपच गाजली होती. ही भूमिका एका प्रत्यक्ष असे जीवन जगणाऱ्या व्यक्तिमत्वावर आधारित होती. लडाख येथील सोनम वांगचूक हे ते व्यक्तिमत्व होय. त्यांनी आपल्या आचारातून एक वेगळे जीवनविश्व उभे केले. कृतिशील व आचारप्रवीण असे त्यांचे कार्य. त्याची प्रेरणा अनेकांनी घेतल्याचे सांगितल्या जाते. चित्रपटामुळे ते अजरामर झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण त्यांचे नामसाधर्म्य असलेले आणखी एक वीर व्यक्तिमत्व आहे. हे दुसरे सोनम वांगचूक पण लडाखचेच. मात्र त्यांनी आपले जीवन देशसेवेला वेचले आहे. त्यांनी सैन्यात अतुलनीय कामगिरी बजावली. आसाम रेजिमेंटमध्ये असताना त्यांनी कारगिल युद्धात अतुलनीय कामगिरी बजावली होती. त्याबद्दल त्यांना ‘महावीर चक्र’ हा देशाचा दुसरा सर्वोच्च सन्मान पण मिळाला. आता ते निवृत्तीचे जीवन जगत आहे.

हेही वाचा : Chhagan Bhujbal : “आज हवा तुम्हारी हैं, कल का तुफान…” छगन भुजबळांचा इशारा नेमका कोणाला?

या ‘रँचो’ वांगचूक यांच्यासोबत त्यांच्या पदवीचा पण उल्लेख केल्या जातो. खरं तर हे ‘रँचो’ मॅगसेसे पुरस्कार विजेते, प्रयोगशील शिक्षक व अभियंता आहेत. तर ते लष्करी अधिकारी. दोन्ही वेगवेगळे. काहीजण याच ‘रँचो’चा उल्लेख महावीर चक्र विजेता म्हणून करतात तेव्हा रँचो ओशाळवाने होतात. एकदा संभाजीनगर येथे कमलकिशोर कदम यांनी रँचो यांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तेव्हा एकाने त्यांचा महावीर चक्र विजेते म्हणून उल्लेख केला. तेव्हा उभे राहून हे रँचो म्हणाले की ‘अच्छा, आपको वो सोनमजी को बुलाना था क्या’. अशी ही सारखी नावे असल्याने होणारी गंमत.

रँचो यांचा आज वर्ध्यात कार्यक्रम आहे. त्यातही ‘महावीर चक्र विजेता’ म्हणून उल्लेख झाला. तशी माहिती दिल्या गेली. कारण काय तर विकीपीडियात दोन्ही वांगचूक यांचा एकत्रितच उल्लेख झाला आहे. मात्र गफलत झाल्याचे लक्षात आल्यावर एक आयोजक संजय इंगळे तिगावकर यांनी लगेच दुरुस्ती करून पाठविली. एक तेवढेच खरे की या निमित्ताने सोनम वांगचूक नावाचे दोन स्वतंत्र व वेगवेगळे प्रतिभाशाली व्यक्तिमत्वे असल्याचे समोर आले.

हेही वाचा : राष्ट्रीय महामार्गांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, मुख्यमंत्र्यांचे गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनवण्याचे…

रँचो म्हणजेच मॅगसेसे विजेते सोनम वांगचूक यांची आज सोमवार १३ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता बजाज सार्वजनिक ग्रंथालय सभागृहात हजेरी लागणार आहे. ते ‘जनसंघर्ष लड्डाख’चा या विषयावर संवाद साधतील. भारतीय लोकशाही अभियानाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is true rancho sonam wangchuk ramon magsaysay award mahavir chakra pmd 64 css