नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी हे निवडणूक लढवित असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. काँग्रेसने गडकरी यांच्या विरोधात नागपूर पश्चिमचे आमदार, काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी महापौर विकास ठाकरे यांना रिंगणात उतरवले आहे. आता नागपुरात गडकरी विरुद्ध ठाकरे, अशी लढत होणार आहे.
२००२ मध्ये नगरसेवक, त्याचवर्षी महापौर, महापालिकेतील विरोधी पक्ष नेते, त्यानंतर काँग्रेसचे शहर अध्यक्षपद, २०१९ मध्ये पश्चिम नागपूरमधून आमदार असा विकास ठाकरे यांचा आजवरचा राजकीय प्रवास आहे. अत्यंत धाडशी, धडाकेबाज नेता अशी काँग्रेस व इतर पक्षात त्यांची ओळख आहेत माजी केंद्रीय मंत्री व काँग्रेस नेते विलासराव मुत्तेमवार यांचे कट्टर समर्थक ही त्यांची दुसरी ओळख. समाजातील सर्व घटकांमध्ये वावर, समर्थक, मदतीला धावून जाण्याची वृत्ती आणि अरे ला कारे ने उत्तर देण्याचा स्वभाव यामुळे संपूर्ण नागपुरात त्यांचा मोठा समर्थक वर्ग आहे. माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या नागपुरातील लोकसभा निवडणूक प्रचाराची मुख सुत्रे ठाकरे हेच सांभाळत असत. त्यामुळे ते प्रथमच लोकसभेची निवडणूक लढवणार असले तरी ती कशी लढवायची याचा अनुभव यांना आहे.
हेही वाचा…चंद्रपूर: भाजप व काँग्रेसचीच चर्चा, छोटे पक्ष झाकोळले
विकास ठाकरे यांच्या नावाचाच प्रस्ताव केंद्रीय समितीकडे पाठवण्यात आला होता. १९ मार्च रोजी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक झाली. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि डॉ. नितीन राऊत प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांनीही ठाकरे यांना नागपुरातून निवडणूक लढवण्यास सांगितले होते.
हेही वाचा…यवतमाळ-वाशिममध्ये निकालाची पुनरावृत्ती की चित्र बदलणार ?
ठाकरे आणि बर्वे २६ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करणार
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दोन्ही काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे आणि रश्मी बर्वे यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. २६ मार्च रोजी उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. नामांकनापूर्वी दोन्ही उमेदवार संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅली काढणार आहेत.