वाशिम : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी चर्चेचा विषय बनला आहे. त्यातच सोमवारी वाशिम येथील आयोजित महिला मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट कुणाचाही उल्लेख न करता महायुतीचा उमेदवार राहणार असल्याचे भाष्य केल्याने कोण उमेदवार राहील याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ येथे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी कार्यक्रम स्थळावर लावण्यात आलेल्या बॅनरवर शिवसेना शिंदे गटातील गटबाजी उघड दिसून आली. खासदार भावना गवळी यांचा मतदारसंघ असताना मृद व जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांचाच बोलबाला दिसून आला होता. तर वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्वात जिजाऊ, अहिल्या, सावित्री, रमाईच्या लेकींचा महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून खासदार भावना गवळी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शहरात येणार असल्यामुळे शहरभर बॅनर लावण्यात आले होते. मात्र या बॅनरवर पालकमंत्री संजय राठोड यांचे फोटो दिसले नाहीत. तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांची अनुपस्थिती जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या आयोजित महिला मेळाव्यात यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघातून संभाव्य उमेदवार कोण राहील याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणाचेही नाव न घेता महायुतीचा उमेदवार राहील, असे भाकीत केल्याने उमेदवारीचा पेच अद्याप कायम असल्याची चर्चा रंगत असून गेल्या २५ वर्षांपासून यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व करणाऱ्या खासदार भावना गवळी यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का? की पालकमंत्री संजय राठोड यांचे नाव पुढे येणार की अन्य दुसराच उमेदवार राहील यावरून उलट सुलट चर्चा रंगत आहेत.

हेही वाचा – मोबाईलप्रमाणेच रिचार्ज करता येणार ‘स्मार्ट प्रिपेड मीटर’, सर्वप्रथम शासकीय कार्यालये, वसाहतींमध्ये लागणार

हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून अमित शहांच्या दौऱ्याचा ‘श्री गणेशा’, अकोल्यातील बैठकीत विदर्भातील सहा मतदारसंघांवर मंथन

उमेदवारीचा संभ्रम मात्र इच्छुकांची जोरदार तयारी

यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघ कुणाच्या वाटेला जाणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झाले नसले तरी विद्यमान खासदार भावना गवळी यांनी आपणच प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले आहे. या मतदारसंघावार महायुतीतील भाजप व अजित पवार गटाचाही डोळा आहे. भाजपमधील राजू पाटील राजे व अजित पवार गटातील जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे इच्छुक असून दोन्ही नेत्यांनी मतदारसंघ पिंजून काढत जोरदार तयारी सुरु केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is washim lok sabha candidate bhavana gawali or sanjay rathod cm eknath shinde said pbk 85 ssb