अकोला : मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातून कुणाला मंत्रिपदाची ‘लॉटरी’ लागणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मंत्रिपदासाठी आमदारांकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असून त्यांनी मुंबईतच ठाण मांडले. मंत्रिपदासाठी विचार होण्यासाठी आमदारांची आतापर्यंतची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची माहिती आहे.
पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यात भाजपचे नऊ आमदार निवडून आले आहेत. त्यातील अनेक आमदारांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली, तर काहींनी विजयाचा चौकार देखील लगावला आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी प्रत्येकाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अकोला जिल्ह्याला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. पाच वर्षांपासून जिल्ह्यात स्थानिक मंत्री नाही. आता जिल्ह्याला स्थानिक पालकमंत्री मिळाले पाहिजे, अशी नागरिकांची आग्रही भूमिका आहे. नव्या सरकारमध्ये जिल्ह्यातून अकोला पूर्वचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांचे नाव चर्चेत आहे. अकोला पूर्वतील मतदारांनी प्रथमच एकाच आमदाराला तिसऱ्यांदा संधी दिली. आ.सावरकरांनी हॅट्ट्रिकचा इतिहास करण्यासोबतच ५० हजार ६१३ मताधिक्यासह शिवसेना ठाकरे गट व वंचितचा चितपट केले. लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघाचा बालेकिल्ला कायम राखण्यात आ.सावरकरांचा सिंहाचा वाटा होता. आता विधानसभेत अकोट व मूर्तिजापूरची जागा निवडून आणण्यात देखील त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. अभ्यासू आमदार म्हणून रणधीर सावरकर यांची ओळख असून देवेंद्र फडणवीसांचे ते निकटवर्तीय आहेत. गटनेता निवडीच्या बैठकीत सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. कॅबिनेट किंवा राज्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार होऊ शकतो, अशी माहिती आहे. मूर्तिजापूर मतदारसंघातून भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांनी सलग विजयाचा चौकार लगावला. अकोट मतदारसंघात विजयी होण्याची प्रकाश भारसाकळेंनी हॅट्ट्रिक केली. त्यामुळे मंत्रिपदासाठी हरीश पिंपळे व प्रकाश भारसाकळे यांच्या नावाची देखील चर्चा सुरू आहे.
हे ही वाचा… धक्कादायक! दुचाकीरून जात असताना खिशातच मोबाईलचा स्फोट; मुख्यध्यापकाचा मृत्यू
वाशीम जिल्ह्यातील भाजपचे दोन्ही आमदार पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचले आहेत. त्यामुळे वाशीम जिल्ह्याला भाजपच्या कोट्यातून मंत्रिपदाची शक्यता दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यात जळगाव जामोदमधून डॉ. संजय कुटे, खामगाव आ.आकाश फुंडकर, चिखलीच्या आ.श्वेता महाले व मलकापूरमधून चैनसुख संचेती निवडून आले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात भाजपच्या कोट्यातून मंत्रिपदाची प्रचंड रस्सीखेच दिसून येते. मंत्रिपदासाठी संजय कुटे व चैनसुख संचेती यांचे नाव चर्चेत आहे. महिला मंत्री करण्याचा विचार झाल्यास श्वेता महाले यांचे नाव समोर येऊ शकते. आकाश फुंडकर यांनी विजयाची हॅट्ट्रिक केल्याने त्यांचे देखील मंत्रिपदासाठी प्रयत्न आहेत. आता कुणाला मंत्रिपदावर संधी मिळते, याकडे पश्चिम वऱ्हाडातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा… दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती, निर्णयास ग्राहक पंचायतीचा विरोध
शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यातूनही प्रयत्न
शिवसेना शिंदे गटाला बाळापूर, रिसोड, मेहकर, सिंदखेड राजा येथे मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. बुलढाण्याची जागा काठावर निघाल्याने पक्षाची लाज राखल्या गेली. त्यामुळे शिवसेनेच्या कोट्यातून पश्चिम वऱ्हाडाला मंत्रिपदाची संधी मिळणे अत्यंत अवघड मानले जात आहे. रिसोड मतदारसंघात पराभव होऊन तिसऱ्या स्थानावर घसरल्यानंतरही विधान परिषदेच्या आमदार भावना गवळी यांनी मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.