कविता नागापुरे, लोकसत्ता
भंडारा : निवडणुका तोंडावर आल्या की सर्वच पक्ष लोकाभिमुख होण्यासाठी तत्पर होतात. सध्या राज्यातसह जिल्ह्यातही भाजप आणि काँग्रेस पक्षामध्ये एकाच गोष्टीची चढाओढ लागली आहे ती म्हणजे लोकांपर्यंत आधी कोण पोहचणार? एकमेकांवर कुरघोडी करीत मतदारांच्या दारात सर्वप्रथम पोहचण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. मात्र यात एका नव्याच वादाला तोंड फुटले आहे. जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेस पक्ष ‘लोकसंवाद यात्रा’ आमचीच आहे, असा दावा करीत ती दुसरा पक्ष हायजॅक करू पाहतोय, असे ठामपणे बोलत आहेत. त्यामुळे आता ही ‘लोकसंवाद यात्रा’ नेमकी आहे तरी कोणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या जिल्ह्यात राजकीय वातावरण तापायला सुरवात झाली आहे. निवडणुकीचे अघोषित वेळापत्रक आले असून लवकरच निवडणूक लागणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आता पासूनच तयारीला लागा व लोकांपर्यंत पोहचा असा “फतवा”च जणू पक्षश्रेष्ठी कडून काढण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हर घर चलो अभियान, यात्रा, जनसवांद व जन संपर्क यात्रा, लोकमिलन यांसारखे कार्यक्रमाना उत आलाय. भाजपा द्वारे जनसंवाद यात्रा तर कांग्रेसची संवाद यात्रा सुरू असल्याचे बोलले जात आहे. मात्र जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानाच्या वर्षपूर्ती निमीत्त काँग्रेसनेच सर्वप्रथम जन संवाद यात्रेला सुरुवात केली असून भाजप आमच्या जनसंवाद यात्रेची कॉपी करत असल्याचेही काँग्रेसी नेत्यांचे म्हणणे आहे. याउलट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांनी जिल्ह्यात जनसंवाद यात्रेचा प्रारंभ केला असून जनसंवाद यात्रा आमचीच असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुधे यांनी केला आहे. त्यामुळे आता यात्रेवरून राजकीय वातावरण पेटणार का? ते कळेलच.
आणखी वाचा-“जिल्हा परिषद शाळा उद्योजकांना विकण्याचा सरकारचा डाव!” शाळा बचाव समितीचा आरोप
दरम्यान दोन्ही पक्ष “जन संवाद” करण्यासाठी चढाओढ करीत असताना राष्ट्रवादीचा शरद पवार गट कसा मागे राहिल? येत्या १३ सप्टेंबरला राष्ट्रवादी नेते रोहीत पवार यांचा सद्धा दौरा आखण्यात आला असून रोहित पवारांची जाहीर सभाही आयोजित केली जाणार आहे. ह्या सर्व राजकीय घडामोडी लक्षात घेता आतापर्यंत घरात बसून असलेले सर्व नेते आता थेट लोकांच्या दारात दिसत आहेत. लोकांचे ऐकून घेण्यासाठी वेळ नसणारे नेते आता वेळ काढून लोकांशी संवाद साधण्यासाठी धडपडत त्यांच्यापर्यंत जात आहेत. त्यामुळेच जनसंवाद यात्रा असो की संवाद यात्रा नागरिकांची चिकार गर्दी पहायला मिळत आहे. या यात्रे दरम्यान सत्ता पक्षाद्वारे आपला पक्ष कसा श्रेष्ठ आणि आणि पाच वर्षात किती व कसा विकास केला याचा पाढा वाचला जात आहे तर दूसरीकडे विरोधी पक्ष सत्ता पक्ष पाच वर्षात कसा निकामी ठरला याची गिनती करून देत आहे. एकंदरित सप्टेंबर महिन्यात राजकीय नेत्याचा दौरा कार्यक्रमाने राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळत आहे.