यवतमाळ : येथे जिल्हाधिकारी असताना महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) संचालक पदावर बदली होण्याचा योगायोग सलग दुसऱ्यांदा घडला. त्यामुळे यवतमाळ येथील जिल्हाधिकाऱ्यांना विद्या प्राधिकरणमध्ये जाणीवपूर्वक बदली दिली जाते की, ही बदली प्रशासकीय शिक्षा असते अशी चर्चा प्रशासन आणि शिक्षण विभागात सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यवतमाळ येथील जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (विद्या प्राधिकरण) संचालकपदी शुक्रवारी बदली करण्यात आली. या पदावर पूर्णवेळ ‘आयएएस’ दर्जाच्या अधिकाऱ्यांचीच नियुक्ती करण्याला राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापूर्वी या पदावर पहिले आयएएस अधिकारी म्हणून यवतमाळ येथूनच तत्कालीन जिल्हाधिकारी एम. डी. सिंग यांची नियुक्ती झाली होती. शासनाने तोच कित्ता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याबाबतही गिरवला. प्राधिकरणला पुन्हा आयएएस अधिकारी मिळाल्याने विद्या प्राधिकरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

हेही वाचा – काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी महादेवाच्या चरणी; नागपुरातील ४०० वर्षे जुन्या मंदिराला भेट

राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता दर्जा उंचाविण्याच्या अनुषंगाने अभिनव उपक्रम राबविण्याचे नियोजन करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विद्या प्राधिकरणावर आहे. शिक्षक, कर्मचारी आणि अधिकारी यांना प्रशिक्षणही देण्यात येत असते. इयत्ता पहिली ते बारावीच्या अभ्यासक्रमाची निश्चितीही करावी लागते. मात्र विद्या प्राधिकरणात अधिकारी, कर्मचारी विभागाच्या कामकाजाऐवजी साईड पोस्टिंग म्हणून कौटुंबिक सोयीसाठी येतात, असे सांगितले जाते. अधिकारी, कर्मचाऱ्यांचीही हिच मानसिकता बनली आहे. या मानसिकतेला शासनाने या प्राधिकरणवर आयएएस अधिकारी नेमून तडा दिला आहे. मात्र प्राधिकरणातील संचालक पदी ‘आयएएस’ अधिकारी नेमण्याचा या प्रथेमुळे शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. प्राधिकरणांतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहेत. त्यासाठीही अशा आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती महत्वपूर्ण आहे, हे आता शासनाच्या निदर्शनास आले आहे. शिवाय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने नुकताच ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’ जाहीर केला. यात महाराष्ट्राची कामगिरी अत्यंत खालावलेली आहे, तसेच शिक्षणाचा दर्जाही घसरला आहे, अशी नोंद केली आहे. मात्र विद्या प्राधिकरण शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे असूनही येथील कामकाजाची घडी विस्कटलेली आहे. यवतमाळ येथून जाणारे नवीन संचालक अमोल येडगे यांच्यासमोर प्राधिकरणमधील ही घडी आणि राज्याचा शैक्षणिक इंडेक्स सुधारण्याचे आव्हान आहे.

हेही वाचा – नागपूर: घोरपड घरात शिरली अन् घरमालकाने घराबाहेर धूम ठोकली; मग झाले काय, वाचा…

प्राधिकरणचा कारभार कायम प्रभारी

विद्या प्राधिकरणचा कारभार बहुतांशवेळा प्रभारी असाच राहिला आहे. यावर तोडगा म्हणून राज्य शासनाने ऑगस्ट २०२१ मध्ये ‘आयएएस’ असलेले यवतमाळचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची प्राधिकरणमध्ये पहिल्यांदाच पूर्णवेळ नियुक्ती केली होती. मात्र, वर्षभरानंतरच त्यांची बदली झाली. त्यानंतर राजेश पाटील, कौस्तुभ दिवेगावकर हे ‘आयएएस’ अधिकारी येथे प्रभारी होते. आता पुन्हा ‘आयएएस’ असलेले यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची पूर्णवेळ संचालकपदी नियुक्ती झाली. मात्र यवतमाळचेच जिल्हाधिकारी विद्या प्राधिकरणाच्या संचालकपदी का नियुक्त केले जातात? हा प्रश्न शैक्षणिक वर्तुळात चर्चेत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why appoint yavatmal district collector to education authority discussion in academic circles nrp 78 ssb