नागपूर : ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आंदोलनस्थळी येऊन दिली. मात्र कुणबी, ओबीसी कृती समिती आंदोलनावर ठाम आहे. आज, सोमवारी दुपारी संविधान चौकातून मोर्चा काढण्यात येत आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि सर्वशाखीय ओबीसी कुणबी ओबीसी महासंघातर्फे नागपुरात सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारला भेट दिली. यावेळी त्यांनी ओबीसीच्या आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही, मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यात येईल, असे सांगितले. पण, ओबीसी नेत्यांनी सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी जात प्रमाणपत्र आणि मराठा समाजाचे ओबीसीकरण करण्याच्या मागणीबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नसल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री शिंदे हे जरांगे पाटील यांना आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगतात आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे वेगळे आरक्षण देऊ म्हणतात. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.
सरकार जोपर्यत मराठा समाजाला सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र देणार नाही आणि मराठा समाजाला कुठून आणि कसे आरक्षण देणार हे स्पष्ट करीत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे कृती समितीचे सुरेश गुढघे पाटील यांनी म्हटले आहे.