नागपूर: घरातील व्यक्तीचे निधन झाले की तेराव्याला किवा वर्षश्राध्दाच्यावेळी भाताचे गोळे (पिंड) तयार करुन ते कावळ्याला खाऊ घातले जाते. ही अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. गेल्या काही वर्षात कावळ्याची संख्या कमी झाली असली तरी ज्या ठिकाणी विधी केला जातो त्या ठिकाणी कावळ्याचा शोध घेऊन ते खाऊ घातले जाते. या मागे काही काय कारण आहे याबाबत अनेकांना उत्सूकता आहे.
अंत्यसंस्काराचे विधी करणारे विवेक जोशी गुरुजी यांनी सांगितले, कावळा पिंडाला शिवणे यामागे पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण वड व पिंपळ हे दोन वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने प्राणवायु उत्सर्जन करतात. जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लाऊ शकतो परंतु फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती होत नाही. या दोन्ही झाडांचे अंकुर स्वरूपातील फळे जेव्हा कावळे खातात आणि ते जेथे विष्ठा करतात. तेथेच हे वृक्ष येतात. कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत.
कावळ्यांची अंडी घालणे (प्रजनन) ही प्रक्रिया भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना पोषक आहार या काळात प्रत्येकाने दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल असे काही शास्त्रकाराचे म्हणणे आहे. माणसांच्या आरोग्यासाठी ही दोन झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच भाताचे गोळे करुन पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपूरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे. या मागे धार्मिक परंपरा आहे त्यामुळे आजही अनेक लोक तेराव्याचा विधी करताना भाताचे गोळे करुन तिथे कावळ्याला खाऊ घालतात. ते खाल्ला की मृत आत्म्याला शांती मिळते, असे सांगितले जाते. मात्र काहींच्या मते ही अंधश्रद्धा आहे.