नागपूर: खुल्या प्रवर्गातील अर्थिक दुर्बल घटकातील सर्व युवक युवतीच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राज्यशासनाची महाराष्ट्र संशोधन व उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत संस्था) २०१९ ला सुरू करण्यात आली. एक संचालक व तीन कर्मचारी हे साखर संकुल शिवाजीनगर पुणे येथे छोट्या एका खोलीत ही अमृत स्वायत्त संस्था काम करते. फक्त कागदोपत्री ही संस्था काम करत आहे का अशी शंका वाटावी अशी परिस्थिती आहे. या संस्थेबरोबरच सुरु झालेल्या सारथी व महाज्योती यांनी कामाचा, निधीचा व जणजागृतीचा अवाका वाढवला. मग अमृतची दयनीय अवस्था का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सन २०१९ ते नोव्हेंबर २०२३ पर्यत एकूण ५५.१२ लाख रु.प्राप्त निधी अमृतला मिळाला आहे. त्यामध्ये खर्च झालेला १८.९९ लाख रु. हा निधी फक्त वेतनावरतीच झाला आहे. आतापर्यंत अमृत संस्थेमार्फत ६ योजना सुरु केल्या असे सांगत आहेत. परंतु अद्यापही प्रत्यक्षात त्या योजना सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे लाभार्थीच्या संख्येचा प्रश्नच येतच नाही.
हेही वाचा – हिवाळी अधिवेशनासाठी विशेष रेल्वेगाडी ‘या’ दिवशी धावणार, जाणून घ्या थांबे आणि वेळ…
हेही वाचा – हिवाळी अधिवेशन : विधानपरिषदेत आतापर्यंत १८०० वर प्रश्न; आजपासून लक्षवेधी स्वीकारणार
एससी, एसटी, ओबीसी, मराठा या घटकांच्या व्यतिरिक्त अनेक जातीसमूहाचे विद्यार्थी या राज्यात शिकत आहेत. त्यांनाही संधी मिळणे गरजेचे आहे. त्या उद्देशाने ही संस्था सुरु केली आहे. यात अडथळे कोण आणते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मनुष्यबळाचा व निधीचा अभाव, योजनेची जनजागृती नसल्याने ही संस्था चार वर्षांपूर्वी सुरु होऊनही अडगळीत पडली आहे. त्यामुळे अमृत संस्थेस अर्थिक ऑक्सिजनची खरी गरज आहे, अशी मागणी स्टुंडंट हेल्पिंग हँडसचे अध्यक्ष अॅड. कुलदीप आंबेकर यांनी केली.