लोकसत्ता टीम
यवतमाळ : येथील प्रियदर्शनी सहकारी सूतगिरणीच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी आले असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीसह शिवसेना उबाठाचा खरपूस समाचार घेतला.
‘आम्ही बघून घेतो, पाहून घेतो, पुरावे दाखवतो, या भाषेचा आता लोकांना कंटाळा आला आहे. एखादी खोटी गोष्ट लोकांसमोर सतत मांडली तर ती खरी वाटते. लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या या खोट्या प्रचाराचा भाजपला फटका बसला. यामुळे भाजपच्या १० जागा तीन ते तेवीस हजार मतांच्या फरकाने गेल्या, अशी कबुलीही चंद्रकांत पाटील यांनी दिली. मात्र राज्यात १२७ विधानसभा मतदारसंघात भाजप महाविकास आघाडीच्या पुढे आहे, असेही ते म्हणाले. कोकणच्या भरवशावर मुंबईत शिवसेना उभी झाली. कोकण, मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा सफाया झाला आहे, हे संजय राऊत कधी समजून घेतील, असा प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.
आणखी वाचा-‘या’ राज्यांतून होते चंद्रपूरमध्ये शस्त्रांची तस्करी
तुम्ही पाहू न घेणार असाल तर आम्ही काय गोट्या खेळतो काय? आम्हीही आमची तयारी व्यवस्थित केली आहे’, या भाषेत राज्याचे संसदीय कार्य व वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना सुनावले.
खासदार संजय राऊत यांनी बोलण्यापूर्वी विचार करायला हवा. महाविकास आघाडीत शिवसेना १८ वरून नऊ जागांवर आली, तर काँग्रेसच्या एका खासदाराचे १३ झाले, राष्ट्रवादीचे आठ खासदार झाले. महाविकास आघाडीत जावून शिवसेनेने स्वत:चे नुकसान तर काँग्रेस, राष्ट्रवादीचे भले केले, असा टोला त्यांनी हाणला. एकनाथ शिंदे यांना उबाठा शिवसेनेपेक्षा दोन लाख मते जास्त पडली, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कधी शुभेच्छाही दिल्या नाहीत, पण तुम्ही या पक्षांना चांदीच्या ताटात घास भरवत आहेत, अशी टीका पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यावर केली. राज्यातील सहकार क्षेत्राला भरघोस निधी आणि सवलती देवून उभारी देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. सहकारी कारखाने, सूतगिनरण्यांना वीज बिलांत सवलत, आर्थिक मदत दिली जात आहे.
आणखी वाचा-शिष्यवृत्ती प्रकरणात नऊ महाविद्यालयांना समाज कल्याणचा इशारा
लोकसभा निवडणुकीपूर्वीच सायोबीन, कापूस, धानाच्या भावातील फरकाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तो आचारसंहितेत अडकला. मात्र शेतकऱ्यांना रक्कम हातात मिळाली नाही तर ते यापूर्वी मिळालेले घर, शौचालय, उज्व्हला गॅस हे सर्व विसरतात, ही टिपणीही चंद्रकांत पाटील यांनी केली. यवतमाळात कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असतानाही येथे कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग का उभे झाले नाहीत, यावर निश्चितच मंथन करून, उपाय शोधले जातील, असे चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. पत्रकार परिषदेस आमदार मदन येरावार, प्रा. डॉ. अशोक उईके, काँग्रेसचे माजी आमदार तथा प्रियदर्शनी सूतगिरणीचे उपाध्यक्ष कीर्ती गांधी आदी उपस्थित होते.