नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या एका अपघातात कारमधील चालकासह पाच जणांवर गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली होती. मात्र, सेंट्रल बाजार रोडवरील अपघात प्रकरणात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत यांचा मुलाचा समावेश आहे. परंतु, पोलिसांनी संकेतवर गुन्हा दाखल करण्याचे टाळले. त्यामुळे संकेतसाठी वेगळा कायदा का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रविवारी मध्यरात्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत आणि त्याचे दोन मित्र अर्जून जितेंद्र हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) हे तिघेही धरमपेठमधील लाहोरी रेस्ट्रॉरेंट आणि बारमध्ये गेले होते. मध्यरात्री साडेबारा वाजता ते ऑडी कारने बार बाहेर पडले होते. सेंट्रल बाजार रोडवरुन ते भरधाव जात होते. सेटर पॉईंट हॉटेलसमोर संकेतच्या कारने जीतू सोनकांबळे याच्या कारला धडक दिली आणि पळून गेले. या धडकेत जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कारला धडक दिल्यानंतर त्यांनी थेट कोराडीकडे पळ काढला. ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी संकेत बावनुकळे कारमध्येच होता. मात्र, सीताबर्डी पोलिसांनी अर्जून हावरे आणि रोनित चिंतमवार यांनाच ताब्यात घेतले. संकेतला सूट देण्यात आली. पोलिसांनी एकदाही संकेत कारमध्ये होता, हे स्पष्ट केले नाही. संकेतला मित्रांनी घरी सोडले. त्यानंतर कार सीताबर्डी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आली. गेल्या दोन महिन्यांपूर्वी वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टोलनाक्याजवळ एका कारने पदपथावर झोपलेल्या काही मजुरांचा अपघात केला होता. त्या प्रकरणात वाठोडा पोलिसांनी चालकासह कारमध्ये बसलेल्या पाचही युवकांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, सीताबर्डी पोलिसांनी फक्त चालक अर्जून हावरेवरच गुन्हा दाखल केला. त्यामुळे संकेत बावनकुळेंसाठीच वेगळा कायदा का? असा प्रश्न विचारला जात आहे.
संकेतची वैद्यकीय चाचणी टाळली
कारचालक अर्जून हावरे आणि रोनित चिंतमवार या दोघांना सीताबर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले. दोघांचीही वैद्यकीय चाचणी केली असता दोघेही मद्य प्यायलेले आढळले. मात्र, त्या दोघांसोबत संकेतला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही तसेच त्याची वैद्यकीय तपासणीसुद्धा केली नाही.
संकेतची पोलिसांनी केली चौकशी
सोमवारी रात्री संकेत बावनकुळे याला सीताबर्डी पोलिसांनी ठाण्यात आणले. त्याची सविस्तर चौकशी केली. त्याने चालक अर्जूनच्या बाजूच्या सीटवर स्वतः बसलेला होतो, अशी कबुली दिली. संकेतला पोलिसांनी व्हीव्हीआयपी वागणूक दिल्याचाही आरोप होत आहे. संकेतला पोलिसांनी नोटीस दिली असून त्याला पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – भीषण! गोंदियात मुसळधार पावसाचा कहर; इमारत कोसळल्याने मायलेकाचा मृत्यू
संकेत बावनकुळे हा अपघात झाला त्यावेळी ऑडी कारमध्ये होता. जीतेंद्र सोनकांबळेच्या कारला धडक दिल्यानंतर ते पळून गेले. या अपघाताप्रकरणी तिघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी कारचालक अर्जूनवर गुन्हा दाखल करुन अटक केली. संकेत आणि रोनित यांना नोटिस दिली असून त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. – राहुल मदने (पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन)
© The Indian Express (P) Ltd