लोकसत्ता टीम
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अलिकडेच पंतप्रधान मुंबई, नाशिक आणि सोलापूर येथे विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने येवून गेले. आता पाचव्यांदा ते महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यात दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली असून, आज सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांची महत्वाची बैठक बचत भवन येथे घेतली. जिल्ह्यातील महिला बचत गटांचा मेळाव्यासाठी पंतप्रधान येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.
रविवार, ११ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा संभाव्य दौरा यवतमाळ येथे होणार आहे. पंतप्रधानांचा हा दौरा कशासाठी होत आहे, याची खात्रीशीर माहिती प्रशासनासही अद्याप देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, या दौऱ्यादरम्यान आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जिल्ह्यातील बचत गटांच्या पाच लाख महिलांशी संवाद साधणार असल्याची माहिती आहे. यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे चार महिन्यांपूर्वी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोहरादेवीचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद मोदी हे फेब्रुवारी महिन्यात पोहरादेवी (जि. वाशिम) येथील विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी येणार असल्याची चर्चा होती. मात्र, पंतप्रधानांच्या संभाव्य दौरा कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी यवतमाळ जिल्हा प्रशासनावर सोपविण्यात आल्याने ते वाशिम ऐवजी यवतमाळ जिल्ह्यातच येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या संभाव्य दौऱ्याची तारीख ११ फेब्रुवारी असली तरी यात बदल होवून १० फेब्रुवारीलाही हा दौरा होवू शकतो, असे समजते.
आणखी वाचा-अभियंता तरुणीवर अत्याचार; जीममध्ये भ्रमणध्वनी लपवून अश्लील चित्रफित, छायाचित्रे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने सुरक्षा, राजशिष्टाचार व इतर बाबींचा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज आढावा घेतला. विमानतळ, पंतप्रधानांचा प्रवास मार्ग, सभास्थळ आदी ठिकाणांची पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बैठकीनंतर प्रत्यक्ष जावून पाहणी केली. नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत यवतमाळ- आर्णी मार्गावरील किन्ही गावाजवळच्या मैदानात ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम झाला होता. त्याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीचे रणशिंग फुंकणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात एक तरी मोठी सभा घेतात, असा जणू पायंडा पडला आहे. २०१४ मध्ये जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध घटकांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तेंव्हा नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. हा कार्यक्रम देशभर गाजला होता. त्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केळापूर (पांढरकवडा) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. आता तिसऱ्यांदा २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ येथे येणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदी दरवेळी यवतमाळातून निवडणुकीचे रणशिंग फुंकत असल्याने विविध तर्क लावले जात आहेत.