वर्धा : विदर्भात मुक्कामी असताना रस्त्यानेच कारचा प्रवास करीत अन्य जिल्ह्यात मंत्री जात असल्याचे नेहमीचे चित्र. शिवाय बहुतांश जिल्हे गुळगुळीत रस्त्याने जोडल्या गेले असल्याने हा प्रवासही सुसह्य झाल्याची सार्वत्रिक भावना आहे. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अवघ्या दीड तासांच्या वर्धा दौऱ्यावर थेट हेलिकॉप्टरने आज येत आहेत.
कारण काय, अशी उत्सुकता पसरली. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले फडणवीस हे सोमवारी रात्री गडचिरोली येथे मुक्कामी थांबले. या ठिकाणी मुख्यमंत्री असताना थांबणारा मी पहिलाच मुख्यमंत्री होतो. आजही थांबणार, असेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रातील ग्यारापत्ती हे शेवटचे गाव. त्यानंतर छत्तीसगडची सीमा सुरू होते. इथे संवाद साधून ते गडचिरोलीत थांबले, अशी माहिती मिळाली.
हेही वाचा – नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थिनी पालकमंत्री फडणवीस यांना म्हणाल्या, आम्हाला…
आज ते गडचिरोलीतून हेलिकॉप्टरने निघून दुपारी सव्वाबारा वाजता सेवाग्राम येथील कस्तुरबा संस्थेच्या हेलिपॅडवर उतरतील. साडेबारा वाजता जिल्हा परिषद सभागृहात खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत उपस्थित राहणार. दीड वाजता पोलिसांच्या , ‘सेवा’ प्रणालीचे त्यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. त्यानंतर लगेच पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस बिट मार्शलसाठी असलेल्या दुचाकी वाहनांचे वितरण करतील. या कार्यक्रमानंतर फडणवीस हे हेलिकॉप्टरनेच उड्डाण करीत पुढील प्रवास करणार आहेत.