लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : गेल्या काही दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंटचे रस्ते आणि अन्य विकासकामामुळे वृक्षतोड करण्यात आली किंवा लावली असल्याचे माहितीच्या अधिकारात विचारले होते. महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने मात्र शहरात अशा तोडलेल्या आणि लावण्यात आलेल्या झाडांची माहिती संख्येत उपलब्ध नसल्याचे सांगितले. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून झाडांची माहिती लपवली जात आहे का किंवा झाडाचे खरे वास्तव काय आहे, असा प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी उपस्थित केला.

नागपूर शहर कधीकाळी हिरवळीने व्याप्त असताना गेल्या काही वर्षात सिमेंटचे रस्ते आणि अन्य कारणांसाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसात शहराची टक्केवारी आता हिरवळीच्या बाबतीत ६० टक्क्यांवर आली आहे. कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात शहरात महापालिकेने लोकसहभागातून किती झाडे लावली याची संख्येत माहिती मागितली होती. त्याशिवाय २०१९ ते २०२४ या काळात किती झाडे तोडण्यात आली आणि झाडे लावण्यासाठी एकूण किती रक्कम देण्यात आली याची वर्षनिहाय माहिती, किती लोकांना झाडे तोडण्याची परवनागी देण्यात आली, परवानगीविना किती लोकांनी झाडे तोडली आणि त्यावर किती लोकांना दंड झाला याची माहिती विचारली असताना या सर्व प्रश्नांच्या उत्तरात महापालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने अशी कुठलीही माहिती संख्येत उपलब्ध नसल्याची माहिती दिली. त्यामुळे विभागाकडून माहिती लपवली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.

आणखी वाचा-RSS Chief Mohan Bhagwat : सध्याची अनुकूलता आमच्या स्वभावाच्या पोषणासाठी प्रतिकूल – सरसंघचालक

शहरातील सेमिनरी हिल्स, महाराजबाग परिसर अशा मोजक्याच परिसरात हिरवळ आहे. मात्र, सेंट्रल ॲव्हेन्यू, सीताबर्डी, सदर, महाल, इतवारी, सक्करदरा, रेशीमबाग, नंदनवन या परिसरात हिरवळ नाही. उलट गेल्या काही दिवसात शहरातील विविध भागात सुरू असलेली सिमेंट रस्त्याची आणि पुलाची कामे सुरू असताना मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे.

ठोस कारणांसह लिखित परवानगी आवश्यक

महापालिकेच्या हद्दीत वृक्षतोडीसाठी लिखित परवानगी आवश्यक आहे. वृक्षतोडीमागे ठोस कारण असेल तरच परवानगी दिली जाते आणि एका झाडाच्या मोबदल्यात पाच झाडे लावणेही बंधनकारक आहे. मात्र, या नियमांचे पालन शहरात होत नाही. कित्येकदा परवानगी मिळाल्यानंतर झाडे लावली जातील याची शाश्वती नाही. नियम कुणीही पाळत नाही. केवळ वीज विभागाला यासंदर्भात परवानगीची गरज नाही. वीज तारांमध्ये झाडाच्या फांद्या त्यांना कापता येतात, पूर्ण झाड कापण्याची परवानगी त्यांनाही नसल्याचे माहितीच्या अधिकारात माहिती देण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is information about trees in nagpur city being hidden by the municipality vmb 67 mrj